पुणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे मनमानी वाटप
By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:43+5:302016-04-03T03:50:43+5:30
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये वाटण्यात आलेल्या १४८ कोटी रुपयांमधील घोटाळे आता समोर येत आहेत. सीआयडीने पुणे जिल्ह्याबाबत
मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये वाटण्यात आलेल्या १४८ कोटी रुपयांमधील घोटाळे आता समोर येत आहेत. सीआयडीने पुणे जिल्ह्याबाबत केलेल्या तपासात नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. बीडसह सहा जिल्ह्यांमधील वाटपाची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे.
आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात महामंडळामार्फत मातंग समाज महिला समृद्धी योजनेंतर्गत २ हजार ५०० लाभार्थींना १२ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. धक्कादायक म्हणजे वाटपाच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून लाभार्थींची यादी मंजूर करवून घ्यायला हवी होती. तसे न करता वाटप झाल्यावर परवानगी घेण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती कशी दिली, असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. सुरुवातीला ३८ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ कोटी रुपये वाटण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तथापि, आता वजनदार नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात अधिक पैसा पळविल्याचेही पुढे येत आहे. वाटपाची एकूण रक्कम १४८ कोटी रुपये असल्याचे सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले. महामंडळातील महाघोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या सीआयडीने टेस्ट केस म्हणून पुणे जिल्ह्यातील वाटपाची तपासणी केली. लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करताच पैसा वाटण्यात आला. आता या कागदपत्रांची पूर्तता करवून घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. धक्कादायक म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती आहे.
बीडमध्ये २८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या बंगल्यावरून हे वाटप झाल्याचे सांगितले जाते. वाटपादरम्यान एकच गर्दी उसळली होती. महिला समृद्धी योजनेंतर्गत
२ कोटी रुपये अमरावती जिल्ह्यासाठी आले आणि ते परस्पर गोंदिया जिल्ह्याकडे वळविण्यात आल्याचीही माहिती आहे.
सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले की, हे ३८ मतदारसंघ ज्या-ज्या जिल्ह्यांत येतात तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही चौकशी करू. सध्या सहा जिल्ह्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
बेअरर चेकने पैसा दिला
बऱ्याच ठिकाणी बेअरर चेकने लाभार्थींना पैसा देण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. आता सीआयडीने बेअरर आणि क्रॉस चेकने किती आणि कोणाला वाटप करण्यात आले याची माहिती मागविली आहे.
घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे क्षेत्रिय व्यवस्थापक एच. व्ही. दळवी आणि रवी रामदास नाडे यांना सीआयडीच्या पुणे येथील पथकाने शुक्रवारी जालना येथे अटक केली. दळवी यांनी महामंडळाचे
९ कोटी रुपये महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम यांच्या सूतगिरणीकडे वळविल्याचा आरोप आहे. नाडे याला महामंडळातून लाखो रुपये देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.