बोरिवलीत फेरीवाल्यांची मनमानी

By admin | Published: August 4, 2016 01:56 AM2016-08-04T01:56:08+5:302016-08-04T01:56:08+5:30

बोरिवली स्थानक पश्चिमेला संपूर्ण रस्ता गोराईच्या शेअर रिक्षावाल्यांनी ताब्यात घेतला आहे.

The arbitrary arrogance of the Borivli | बोरिवलीत फेरीवाल्यांची मनमानी

बोरिवलीत फेरीवाल्यांची मनमानी

Next


मुंबई : बोरिवली स्थानक पश्चिमेला संपूर्ण रस्ता गोराईच्या शेअर रिक्षावाल्यांनी ताब्यात घेतला आहे. तर या परिसरात दिवसागणिक फेरीवाल्यांची संख्याही वाढते आहे. शिवाय येथील रिक्षावाले वाटेल तेवढे भाडे घेऊन प्रवाशांना लुटतात. तसेच एका रिक्षात ५ ते ६ माणसे कोंबून वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर जलद वेगाने रिक्षांची ये-जा सुरू असते. या सर्व कारणांमुळे बोरीवलीतील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन ढिम्म असल्याने बोरीवलीकर संतप्त झाले आहेत.
बोरीवलीत पश्चिमेला मंडईत भाजी विक्रेतेही भररस्त्यात गाड्या उभ्या करून विक्री करतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची अडवणूक होते. शिवाय बोरीवली पश्चिमेच्या स्कायवॉक येथील बसथांब्यावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांना बेस्टची वाट पाहण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागते. यामुळे बेस्टमध्ये चढण्यासही प्रवाशांना कसरत करावी लागते. शिवाय वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. (प्रतिनिधी)
>कार ब्युटीफिकेशन दुकानांचा मनस्ताप
बोरीवली स्थानकानजीक असलेल्या गोकूळ हॉटेल सिग्नल ते देवीदास सिग्नलच्या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार ब्युटीफिकेशनची दुकाने असून, या दुकानांचा बोरीवलीकरांना मनस्ताप झाला आहे.
येथील केवळ ६-७ दुकानदारांच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या १५ निवासी वसाहतींमधील रहिवाशांना त्रास होतो आहे. हे दुकानदार आणि तेथील कर्मचारी संपूर्ण पदपथ तर सामान्यांसाठी बंद करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत जवळपास ५० ते ६० कार डबल पार्किंग करून उभ्या असतात.
>वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील बोरीवलीचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील चांदगुडे (नॅशनल पार्क, पूर्व) याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती मुंबई काँग्रेस प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी दिली. त्यामुळे बोरीवली- दहिसरकरांना सेवा देण्यासाठी चांगला अधिकारी देण्यात यावा, म्हणून परिवहन मंत्र्यांकडे चांदगुडे यांच्या विरोधात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
>रिक्षाचालकांचा
मनमानी कारभार
बोरीवलीमधील निम्म्या रिक्षाचालकांकडे बॅच, परवाना, रिक्षा चालविण्याचा पोशाखसुद्धा नाही, तरीही वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी बेस्टने बोरीवली स्थानक ते भगवती रुग्णालय या मार्गाचे भाडे १८ रुपये होते; मात्र रिक्षाचालक २२ रुपये प्रवाशांकडून घेतात.

Web Title: The arbitrary arrogance of the Borivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.