कॉस्मोपोलिटीन शाळेकडून मनमानी शुल्क

By admin | Published: June 8, 2017 03:44 AM2017-06-08T03:44:50+5:302017-06-08T03:44:50+5:30

मीरा रोडच्या शितलनगर मधील कॉस्मोपोलिटीन शाळेच्या मनमानी शुल्क आकारणी विरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला

Arbitrary charge from the Cosmopolitan school | कॉस्मोपोलिटीन शाळेकडून मनमानी शुल्क

कॉस्मोपोलिटीन शाळेकडून मनमानी शुल्क

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडच्या शितलनगर मधील कॉस्मोपोलिटीन शाळेच्या मनमानी शुल्क आकारणी विरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महापौरांनीही पालकांच्या तक्रारीनंतर शाळेविरोधात कारवाईचे निर्देश दिल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.
मीरा रोडच्या शितलनगरमध्ये कॉस्मोपोलिटीन नावाची शाळा आहे. पाठक दाम्पत्य शाळेचे संचालक आहेत. दहावीपर्यंतच्या शाळेत सर्वसामान्य व मध्यमवर्गीय पालकांची मुले शिकतात. गेल्या वर्षापासून शुल्क वाढीवरून पालकांच्या तक्रारी सुरू आहेत.
पालकांनी महापौर जैन यांच्यासह शिक्षण विभाग व मुंबई ग्राहक पंचायत कडे तक्रारी केल्या आहेत. पालकांनी सांगितले की, आमच्याकडून ९ हजार रुपये मिसलेनिअस शुल्क व ९५० रुपये मासिक शुल्क अधिक टर्म शुल्क आदी आकारले जाते. आम्ही गेल्यावेळी विरोध केल्यावर यंदा मिसलेनिअस शुल्क यंदा ५ हजार, मासिक शुल्क १३५० अधिक टर्म शुल्क तसेच २७५ रुपये संगणक शुल्क केले आहे. पुर्नप्रवेश शुल्कही आकारले जाते. ही शुल्क वाढ अवास्तव असून पालक- शिक्षक संघटना केवळ नाममात्र आहे.
शिवाय पुस्तके, वह्या शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती करतात. बाजार भावापेक्षा दुप्पट किंमत घेतली जाते. शाळेची इतकी एकाधिकारशाही आहे की, मीरा रोड भागातील पुस्तक विक्रेते आम्हाला शाळेतूनच पुस्तके घ्या, आम्ही देणार नाही असे सांगतात.
पालकांनी महापौरांकडे आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.
मनमानी शुल्क आकारणीला विरोध करणाऱ्या पालकांना तुमच्या मुलांना येथून काढून पालिका शाळांमध्ये टाका असे व्यवस्थापनाकडून धमकी दिली जाते असे पालक म्हणाले. पालकांनी मिसलेनिअस शुल्क, फी वाढ तसेच पुस्तक - वह्या खरेदी सक्ती बंद करण्याची मागणी केली आहे. पालकांच्या तक्रारींवरून महापौरांनी शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांना कारवाईचे निर्देश दिले. तर पालकांनी शाळेबाहेर जमून निषेध आंदोलन चालवले आहे.
देशमुख यांनी शाळा व्यवस्थापनास नोटीस बजावून पालकांच्या तक्रारींबाबत खुलासा मागवला आहे. या बाबत रविवारी शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.

Web Title: Arbitrary charge from the Cosmopolitan school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.