शासनाचा महसूल बुडविणाऱ्या ठेकेदाराला चाप
By admin | Published: August 25, 2016 03:24 AM2016-08-25T03:24:19+5:302016-08-25T03:24:19+5:30
माती उत्खनन करून शासनाचा सुमारे रुपये ३ लाख ८३ हजार इतका महसूल बुडविला असल्याची बाब डिसेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली होती.
वसई : विरार शहर महानगर पालिकेच्या ठेकेदाराने पापडी येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली माती उत्खनन करून शासनाचा सुमारे रुपये ३ लाख ८३ हजार इतका महसूल बुडविला असल्याची बाब डिसेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली होती. शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी याप्रकरणी हा महसूल दंडासह वसूल करावा याकरिता शासनाकडे मागणी करून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस सदरची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून विहित कार्यपद्धतीनुसार सक्तीच्या उपायांनी वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईच्या तहसीलदारांना दिले आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी ही बाब १२ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महसूल सचिव आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारीय पालघर यांनी माहे, आॅक्टोबर २०१५ मध्ये वसईच्या तहसिलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारांच्या वरदहस्तामुळे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादामुळे कंत्राटदारावर कोणत्याही स्वरूपाची ठोस अशी कारवाई होत नव्हती. अखेरीस हा विषय हा विधानसभा सदस्य बळीराम शिरसकर यांच्यामार्फत विधिमंडळात अतारांकीत प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला. त्यानुसार संबंधित कंत्राटदार यांनी दंडाची रक्कम शासनजमा केली नसल्याने ही रक्कम सक्तीच्या उपायांनी वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)