लाचखोरांना चाप

By admin | Published: October 1, 2014 12:54 AM2014-10-01T00:54:40+5:302014-10-01T00:54:40+5:30

शासकीय कार्यालयातील लाचखोरांसाठी मंगळवार कर्दनकाळ ठरला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) केलेल्या कारवाईत न्यायालयातील महिला पोलीस हवालदारासह, पटवाऱ्यास आणि

Archers to bribe | लाचखोरांना चाप

लाचखोरांना चाप

Next

एसीबीचा धडाका : पोलीस, पटवारी आणि निलंबित स्पॅन्को कर्मचाऱ्यास पकडले
नागपूर : शासकीय कार्यालयातील लाचखोरांसाठी मंगळवार कर्दनकाळ ठरला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) केलेल्या कारवाईत न्यायालयातील महिला पोलीस हवालदारासह, पटवाऱ्यास आणि स्पॅन्कोच्या एका निलंबित कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच दिवशी तब्बल तिघांवर झालेल्या या कारवाईने शासकीय कार्यालयातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
न्यायालयात महिला पोलीस अडकली
जिल्हा व सत्र न्यायालयातील एका कोर्ट वॉचर (लोकसेवक) महिला पोलीस हवालदारास आॅटो चालकाकडून ७०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. कविता सुनील पंचवटे (३८) (बक्कल नं. ५०७६) असे आरोपी महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार व त्याचा मित्र आॅटो चालक यांचे आॅटो अजनी विभागांतर्गत चालान करण्यात आले होते. तक्रारदार व त्याच्या मित्राने मंगळावर ३० सप्टेंबर रोजी सदर चालानचा प्रत्येकी दंड २१०० रुपये प्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालयात भरला. आरोपी कविता पंचवटे ही कोर्टवॉचर म्हणून जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. तिच्याकडे दंड भरल्याची पावती देण्याचे काम आहे. तक्रारकर्ते दंड भरल्याची पावती मागण्यासाठी तिच्याकडे गेले, तेव्हा तिने ७०० रुपयाची लाच मागितली. आॅटो चालकाने अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोकडे यासंबंधात तक्रार केली. त्यावरून आज मंगळवारी सिव्हील लाईन्स येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोच्या चमुने सापळा रचला. सापळ्यादरम्यान आरोपी कविता पंचवटे हिला ७०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सदर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कुहीत पटवारी फसला
शेतीचा फेरफार करण्यासाठी शेतकऱ्याकडून ८ हजार रुपयाची लाच घेताना कुही तालुक्यातील तितुर येथील पटवाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहाथ पकडले. संजय राठोड असे आरोपी पटवाऱ्याचे नाव आहे. तक्रारकर्ते याचे शेत २४ आराजी ५.४८ हेक्टर मधील १.६० हेक्टर शेत प्रत्येकी दोन मुलांमध्ये बरोबर वाटून द्यायचे होते. त्यामुळे शेतीचा फेरफार करण्यासाठी पटवारी संजय राठोड यांचेकर्ते तक्रारकर्ते गेले. तेव्हा त्यांनी २२ हजार रुपयांची लाच मागितली. यापैकी २० हजार रुपये अगोदर आणि २ हजार रुपये नंतर देण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या सांगण्यावरून मंगळवारी सापळा रचण्यात आला. अगोदर ८ हजार रुपये देण्याचे ठरले. कुही बस स्टॉपवर लाचेची रक्कम देण्याचे निश्चित झाले. सापळ्यादरम्यान आरोपीला तक्रारकर्त्याकडून ८ हजार रुपये घेताना पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंबित कर्मचाऱ्यावर सापळा
स्पॅन्कोतील निलंबित तांत्रिक कर्मचाऱ्यास एका वीज ग्राहकाकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले. कैलास चवरे असे या लाचखोर आरोपीचे नाव आहे. चवरे हा स्पॅन्कोमध्ये तांत्रिक कर्मचारी असून सध्या तो निलंबित आहे. तक्रारकर्ते हे किरायाने राहत असून त्यांच्याकडे घरमालकाच्या नावे वेगळे विद्युत मीटर आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या दरम्यान स्पॅन्को कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांनी मीटर तपासण्याचे कारण सांगून त्यांच्या घरातील मीटर काढून नेले. त्यानंतर दुपारी एका कर्मचाऱ्याने त्यांना फोन केला आणि ‘तुमच्या मीटरमध्ये खराबी असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. कायदेशीर कार्यवाहीतून वाचायचे असेल तर २० हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारकर्त्यास संशय आला. त्यांनी अ‍ॅण्टी करप्शन ब्युराकडे तक्रार केली. मंगळवारी तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. लाचेच्या एकूण रकमेपैकी १६ हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आरोपी कैलास चवरे याला १६ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Archers to bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.