धनुष्यबाणाची ‘प्रत्यंचा’ झाली सैल

By admin | Published: January 19, 2017 03:31 AM2017-01-19T03:31:06+5:302017-01-19T03:31:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे.

The archery's 'reality' turned out to be the reality | धनुष्यबाणाची ‘प्रत्यंचा’ झाली सैल

धनुष्यबाणाची ‘प्रत्यंचा’ झाली सैल

Next

आविष्कार देसाई,

अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे. हा वाद मिटल्याने त्याचा दूरगामी परिणाम रायगडच्या राजकारणावर होणार आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी धनुष्यबाणाची करकचून ताणलेली प्रत्यंचा सैल करावी लागली आहे. तटकरे यांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला निशाणा बनविणाऱ्यांना आता त्यांच्या राजकीय व्यूहरचनेत बदल करावा लागणार आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंब एकत्र आल्याने शिवसेनेला हा मोठा हादरा बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यामधील वाद बऱ्याच कालावधीपासून सुरू होता. भाऊबंदकीमधील हा वाद काही लपून राहिलेला नव्हता. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जायची, परंतु वाद नसल्याचा आव दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमातून दाखवत होते. सुनील तटकरे यांनी राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची पदे उपभोगली. त्यांची कीर्ती, त्यांच्या सोबत सतत असणारा लवाजमा याची भुरळ कोणालीही पडली असतीच. सुनील तटकरे यांच्यासोबत असलेले हे वलय आपल्याभोवतीही घोंघावत राहावे, असे बंधू अनिल तटकरे यांना वाटणे स्वाभाविकच आहे. यासाठी त्यांनी आमदारकीचा हट्ट धरला, अनिल तटकरे विधान परिषदेवर निवडूनही आले. त्यानंतर त्यांचे पुत्र अवधूूत तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघातून उमेदवारी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात आल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. सुनील तटकरे हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने श्रीवर्धन मतदार संघातून त्यांचा मुलगा अनिकेत अथवा मुलगी अदिती यांना उमेदवारी मिळावी असा तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आग्रह होता. परंतु पुतण्याच्या हट्टापायी ती जागा अवधूत तटकरे यांना सोडण्यात आली. अवधूत तेथे दोन आकडी मतांच्या फरकाने विजयी झाले.
जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या पदावर सुनील तटकरे यांच्या वहिनी शुभदा तटकरे यांनाही सुनील तटकरे यांनी संधी दिली आहे हे नाकारून चालणार नाही. सततच्या या राजकीय संघर्षामुळे दोन कुटुंबात कलह निर्माण झाला होता.
रोहा नगर पालिकेच्या निवडणुकीत अवधूत यांचे बंधू संदीप यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवधनुष्य हातात घेतले. संदीप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले उमेदवार संतोष पोटफोडे यांच्या विरोधात अर्ज दाखल करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. पोटफोडे काही मतांनी विजयी झाले, तर संदीप तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. आपल्या भांडणाचा फायदा इतर राजकीय पक्ष उचलत आहे याची जाणीव सुनील तटकरे यांना होती. त्यांच्या या गृहकलहात एकच व्यक्ती मध्यस्थी करु शकत होती आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार
आहे.
>शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना चपराक
बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. तटकरे कुटुंबाच्या गृहकलहाचा फायदा घेऊन दक्षिण रायगडात राजकीय घोडदौड करता येईल, असे मनसुबे आखणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ही फार मोठी चपराक बसली आहे. त्यामुळे त्यांना आता वेगळी राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे. यापुढे आता निवडणुकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The archery's 'reality' turned out to be the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.