आर्ची, परश्यासोबत सेल्फी
By Admin | Published: May 4, 2017 02:25 AM2017-05-04T02:25:10+5:302017-05-04T02:25:10+5:30
अवघ्या महाराष्ट्राला याड लावलेल्या सैराट या हृदयस्पर्शी मराठी चित्रपटातील नायिका आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू, नायक परश्या
लोणावळा : अवघ्या महाराष्ट्राला याड लावलेल्या सैराट या हृदयस्पर्शी मराठी चित्रपटातील नायिका आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू, नायक परश्या ऊर्फ आकाश ठोसर व चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे १ मेपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.
कथानक व संगीताने चित्रपट रसिकांना झिंगाट करून सोडलेल्या आर्ची व परश्या या जोडीची एक झलक पाहण्यासाठी उताविळ झालेल्यांना आता थेट लोणावळ्यात येऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेता येणार आहे. तेसुद्धा अंगरक्षक व पोलीस यांची धक्काबुक्की न खाता. लोणावळ्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये हे पुतळे ठेवण्यात आले असून, या पुतळ्याचे अनावरण म्युझियमचे संचालक सुभाष कंडलूर व वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांच्या हस्ते करण्यात आले. सहा महिन्यांपासून हे पुतळे बनविण्याचे काम सुरू होते. सुंदर व हुबेहुब असे हे पुतळे बनविण्यात आले आहेत.
भारतातील पहिले वॅक्स म्युझियम केरळ येथील कलावंत सुनील कंडलूर यांनी लोणावळ्यात सुरू केले आहे. गेल्या दहा वर्षांत राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, चित्रपट, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या शंभराहून अधिक सेलिब्रेटींचे मेणाचे पुतळे या म्युझियममध्ये सुनील कंडलूर यांनी साकारले आहेत. सैराटमधील लोकप्रिय कलाकार आर्ची, परश्या व नागराज यांचे पुतळे येथे हुबेहुब बनविण्यात आले आहेत. सलग सुट्याांमुळे लोणावळ्यात सोमवारी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने पुतळ्याचे अनावरण होताच नागरिकांनी झुंबड उडविली. सर्वप्रथम या पुतळ्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरू होती. म्युझियममध्ये रिपाइंचे नेते रामदास आठवले, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, क्रिकेटर हरभजन सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण येत्या १५ दिवसांत करण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये बाहुबली या सुपरस्टार सिनेमातील तिन्ही कलाकारांचे पुतळे बनविण्यात येणार असल्याचे सुनील कंडलूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
देवगडमध्येही म्युझियम
महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती व महाराष्ट्रीय कलाकारांचा भरणा असलेले नवीन वॅक्स म्युझियम येत्या १० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती म्युझियमचे संचालक सुभाष कंडलूर यांनी दिली. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.