आर्ची अद्यापही शाळेकडे फिरकली नाही
By admin | Published: June 21, 2016 08:23 PM2016-06-21T20:23:34+5:302016-06-21T20:28:11+5:30
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यंदा दहावीत गेली तरी अद्याप शाळेकडे फिरकली नाही़
ऑनलाइन लोकमत,
सोलापूर, दि. 21 - लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यंदा दहावीत गेली तरी अद्याप शाळेकडे फिरकली नाही़. सध्या राज्यातील तमाम युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरु शाळा सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी शाळेत हजर झाली नसल्याने नेटीझन्सकडून विविध प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. मात्र रिंकू अद्याप शाळेत गैरहजर असली तरी शाळेकडून कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती रिंकू शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा जैन यांनी लोकमतला सांगितले. ती यंदा इयत्ता ९ वीतून १० वीत गेली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष आरंभ होऊन आज सप्ताह उलटला तरी इयत्ता १० वीत शिक्षण घेणारी सैराटची नायिका रिंकू राजगुरु शाळेत गैरहजर राहिली असून तिच्या बाबतीत सर्वसामान्य विद्यार्थी सातत्याने अनुपस्थित राहिल्यास शासनाचे जे नियम लागू आहेत. त्याच नियमानुसार तीन महिन्यांत रिंकूला उपस्थित राहण्याची वाट पाहून नंतर तीचे शाळेतील पटावरील नाव कमी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सैराटमुळे रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळे तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिला पाहण्यासाठी व भेटण्यासाठी तरुणाई धडपडत असुन अकलूज येथे जिजामाता कन्या प्रशालेत शिकणा-या रिंकू राजगुरुचे दर्शन घडावे म्हणून शाळेच्या आरंभास प्रसिद्धी माध्यमांसह तरुणाई शाळा परीसरात उपस्थित होते. परंतु रिंकू शाळेला गैरहजर राहिल्याने सर्वांची निराशा झाली.