पंतप्रधानांकडून शिल्पकार सुतार यांचा अवमान नाही : अनिल सुतार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:52 AM2018-11-07T11:52:45+5:302018-11-07T11:54:22+5:30
कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांचा पुतळ्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी पंतप्रधानांकडून अवमान ...
कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांचा पुतळ्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी पंतप्रधानांकडून अवमान झालेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र त्या व्हिडीओतील जॅकेट घातलेली व्यक्ती हे राम सुतार नाहीत.शिवाय सूतार यांचा कोणताही अवमान नव्हेच तर या समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला असल्याची माहिती त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या संकल्पनेतून नर्मदेच्या सरदार सरोवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हा जगातील सर्वांत मोठा पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे ३१ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात जॅकेट घातलेली एक वयस्कर व्यक्ती पंतप्रधानांच्या शेजारी येऊन उभारते आणि पंतप्रधान मोदी त्यांची दखलही न घेता तेथून निघून गेल्याचे दिसते. जॅकेट घातलेले ती व्यक्ती म्हणजे शिल्पकार राम सुतार असून, पंतप्रधानांनी त्यांचा अवमान केला, असा संदेश या व्हिडीओसोबत पाठविला जात आहे.
याबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने राम सुतार यांचा मुलगा अनिल यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘व्हिडिओतील ते वयस्कर व्यक्ती माझे वडील नाहीत. मी आणि वडील असे आम्ही दोघेही समारंभाच्या मुख्य मंडपामध्ये बसलो होतो. कार्यक्रमादरम्यान वडिलांचा शाल देऊन सत्कारही करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमात वडिलांचा अवमान होण्यासारखी कोणतीही गोष्ट घडलेली नाही.’