गोळ्या घालायला शेतकरी दहशतवादी आहेत का?

By admin | Published: June 24, 2017 04:23 AM2017-06-24T04:23:33+5:302017-06-24T04:23:33+5:30

आपल्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ््या कसल्या घालता? ते काय दहशतवादी आहेत?

Are farmers able to make bullets? | गोळ्या घालायला शेतकरी दहशतवादी आहेत का?

गोळ्या घालायला शेतकरी दहशतवादी आहेत का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आपल्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ््या कसल्या घालता? ते काय दहशतवादी आहेत? केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार तर मग हा प्रश्न का सुटत नाही? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांवर पेलेट गनमधून केलेल्या गोळीबाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. हीच मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले.
नेवाळीत गुरुवारी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी छर्ऱ्याच्या बंदुकांतून केलेल्या गोळीबारात, जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन विखे-पाटील यांनी विचारपूस केली. घटना कशी घडली हे जाणून घेतले. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, सचिन पोटे, संजय चौपाने, वंडार पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध करते ते म्हणाले, ‘या सगळ्या प्रकाराला भाजपा-शिवसेनेचे सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुटू शकला असता. त्यासाठी पोलिसी बळाचा वापर करण्याची काही गरज नव्हती. पोलिसांकडून गोळीबार करून, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आंदोलनानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी गावातील घरांची झडती घेताना पुन्हा पेलेट गनचा वापर करून गोळीबार केला. काही वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. पोलीस शेतकरी आणि ग्रामस्थांना गुन्हेगाराची वागणूक देत असल्याची बाब दुर्दैवी आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून शेतकरी जमीन कसतो आहे. ‘कसेल त्याची जमीन’ या तत्त्वानुसार त्याला जमिनीवर हक्क मिळाला पाहिजे. सरकारने स्वत:हून पुढे येऊन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर केली पाहिजे. तिचे हस्तांतर केले पाहिजे.’
संरक्षण खात्याने राष्ट्रहितासाठी जमीन घेतली असेल, तर आम्ही व आमचा शेतकरी राष्ट्रहिताच्या विरोधात नाही. मात्र, संरक्षणमंत्र्यांनी बाहेर काही वक्तव्य करण्यापेक्षा चर्चा करून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. दहशतीच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. खासदार शिवसेनेचे आहेत. त्यांनी हा प्रश्न सोडविला नाही. त्यांच्यासह हे शिवसेना-भाजपाचे अपयश आहे. राज्यात व केंद्रात शिवसेना भाजपाचे सरकार असून, त्यांच्याकडून प्रश्न सुटत नसल्याबद्दल विखे यांनी टीका केली.
संरक्षण खात्याने तेथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. संरक्षण खात्याचे अधिकारी या प्रकरणावर समोर येऊन बाजू का मांडत नाहीत? महसूल खात्याचे अधिकारी, कोकण विभागीय आयुक्तांचे मौनही सरकारची मखलाशी करणारे आहे, असा टोलाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.


‘पोलिसांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल करा’
रुग्णालयातून बाहेर पडताच विखे-पाटील यांना शेतकऱ्यांनी गराडा घातला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवरच ठाण मांडले. भाजपाने दिलेले आश्वासन निवडणुकीनंतर पाळले नाही, असा उल्लेख एका ग्रामस्थाने करताच, विखे पाटील हसले. शेतकऱ्यांना जमीन परत करा, शेतकऱ्यांना दिली जाणारी गुन्हेगारासारखी वागणूक रोखावी, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह महिलांनी केली. त्यावर विखे म्हणाले, शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला, म्हणून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार असेल, तर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्यांच्या विरोधातही त्याच आशयाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हिंसा केवळ शेतकऱ्यांनी केली नसून, पोलिसांकडूनही झाली आहे. या बाबी मी सरकारदरबारी मांडणार आहे.


आगरी समाजाचा पाठिंबा
आगरी समाजसेवा संस्थेने या आंदोलनाला पाठिंबा दिला. हा प्रश्न सुटला नाही, तर ठाणे जिल्ह्यातील आगरी समाज या आंदोलनात उतरेल, असा इशारा या संस्थेचे पदाधिकारी भालचंद्र पाटील यांनी दिला.

पोलीस उपायुक्तांना
विचारला जाब
आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा जमाव हिंसक झाला. त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडायचे होते. कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील, अशा सूचना मेगाफोनवरून न देता आंदोलनकर्त्यांवर थेट पेलेट गनचा वापर करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे याना विखे-पाटील यांनी विचारला. त्यावर मी या प्रकरणी सविस्तर माहिती देतो, असे आश्वासन उपायुक्त शिंदे यांनी दिले.

आमदार साहेब, कुठे होता आपण?
कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर हे रुग्णांची पाहणी करण्यासाठी आले असता, शेतकरी तरुणांनी त्यांना घेराव घातला. घटनेला ३० तास उलटून गेले, तरी आपण आला नाहीत. आमदारसाहेब, आपण कुठे होता? असा सवाल त्यांनी केला. त्यावर ‘मी बाहेरगावी होतो, पण फोनवर मी संपर्कात होतो,’ असा खुलासा त्यांनी केला.नेवाळीच्या प्रश्नासाठी मी यापूर्वी बैठका घेतल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांची जमीन परत मिळावी, याच मताचा मी आहे. आता प्रश्न काय निर्माण झाला, त्यावर चर्चा करू. २९ जूनला संरक्षण राज्यमंत्री बैठक घेणार आहेत. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. रुग्णांच्या उपचारासाठी शिवसेनेचे नगरसेवक नवीन गवळी सहकार्य करीत असल्याचा उल्लेख आमदार भोईर यांनी केला.

Web Title: Are farmers able to make bullets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.