VIDEO- खरंच भुतं असतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 05:31 PM2018-03-19T17:31:02+5:302018-03-19T17:31:02+5:30
भुतं असतात का? खूपच आवडीनं चघळला जाणारा विषय म्हणजे भुतांचा! मुळात भुतांबद्दल बहुसंख्यांच्या मनात प्रचंड भीतीच असते. ते अस्तित्वात नसले तरी भीती मात्र असतेच असते.
- स्नेहा मोरे
कोणत्याही देशात जा, कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही गावात जा भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळतातच मिळतात. नसलेल्या भुतांच्या असलेल्या भीतीचाच मग गैरफायदा घेतला जातो काही मतलबींकडून. मांत्रिक, तांत्रिक वगैरेंची ही जमात भलतीच कमाई करते. सामान्यांना नाडते त्यामुळेच लोकमतचा हा एक प्रयत्न...स्नेहा मोरे यांचा खास रिपोर्ट थेट स्मशानातून...खरंच भुतं असतात?
स्मशानभूमीत थेट सरण रचतात तेथेच बसून भुतांच्या शोधावर बोलत मनाला बोध देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भुतांविषयी गावगप्पा खूपच रंगतात. नकळतण्या वयापासूनच भुतांच्या गोष्टी, गाव-गजाली कानावर पडतात. भीती लवकर विकली जाते असे म्हणतात तसे नसलेल्या भुतांचा मनावर चांगलाच पगडा बसतो. न पाहिलेल्या भुताविषयी आपणही कळत-नकळत प्रचारकी भूमिका पार पाडू लागतो. त्यामुळेच भुतांच्या तथाकथित अस्तित्वालाच आव्हान देणारे प्रश्न उपस्थित करत विज्ञानमार्गाने गप्पा रंगल्या.
पनवेल येथील काळूंद्रे गावातील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित स्मशानसहल पार पडली. शनिवारी मृत्यूंजय अमावस्येच्या मध्यरात्री सरणाशेजारी बसून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मस्त गप्पा मारत रात्र जागवली. भूत म्हणजे काय , भूत-आत्म्याच्या संकल्पना , स्मशानात येताना मनात असलेली भीती अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या.
नवी मुंबईप्रमाणेच भायखळा, घाटकोपर, वसई, कर्जत, मुलूंड, कांजूरमार्ग अशा विविध भागांतून तरुणाईने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते मनोहर तांडेल यांनी उपस्थितांना चमत्कारांचे सादरीकरण करुन दाखविले, या प्रात्यक्षिकांचा अनुभव उपक्रमातील सहभागींनीही घेतला. याप्रसंगी, स्मशानात महिलांना प्रवेश निषिद्ध असून महिलांची उपस्थितीही उल्लेखनीय होती. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते , मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रदीप पाटकर यांची संकल्पना असलेल्या ‘शोध भूताचा…बोध मनाचा’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. गप्पा आटोपत्या घेतल्यानंतर लक्षात आलं अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक भीतीवरच्या गप्पा मात्र अस्सल रंगल्या! अर्थात हेतू प्रबोधनाचा असल्याने निघताना प्रत्येकाच्याच मनात समाधानही वेगळंच होतं.