आम्ही शहीद कुटुंबीय नाही का?
By admin | Published: September 13, 2016 04:57 AM2016-09-13T04:57:59+5:302016-09-13T04:57:59+5:30
कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली.
मनीषा म्हात्रे, मुंबई
कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचीच नावे पोलीस दफ्तरी असल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. अशाच प्रकारे २०१२ मध्ये धाडसी कामगिरी करत मृत्यू पावलेल्या दत्ता सरनोबत कुटूंबियांनी आम्ही शहीद कुटुंबीय नाही का? अशी व्यथा ’लोकमत’कडे मांडली.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना अजय गावंड यांच्यासह नितीन परब, दत्तू अप्पा सरनोबत यांच्यासारख्या काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले. अशा शहीद पोलिसांना आर्थिक भरपाई देण्याचे २००९ च्या शासन निर्णयात नमूद आहे. त्यात २०१४ मध्ये शहीद कृतज्ञता निधीची भर पडली. यातून १० लाख रुपयांची मदत शहीद कुटुंबियांना दिली जाते. यापैकी ही मदत नितीन परब यांना मिळाली. मात्र असे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्या फाईली चाळल्या जातात. त्यांना कर्तव्य नोकरी, २५ लाख मदतीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात तुटपुंजी मदत करत त्यांची बोळवण केली जाते. वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या निधनानंतर शासनाला गावंड यांची जाग आली. त्यांनी दिड वर्षानंतर गावंड यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर केली. गावंड, शिंदे, परब यांच्यासारखेच दत्तू सरनोबत यांचा पुन्हा एकदा पोलीस दलाला विसर पडलेला दिसून आला. एसआरपीएफ मध्ये १२ वर्षानंतर सेवा बजावल्यानंतर वयाच्या ५२ व्या वर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. सप्टेंबर २०१२ मध्ये पोलिसावर हल्ला करून गाडी पळवून नेणाऱ्या दोघा चोरटयांना पकडताना त्यांच्यावर हल्ला झाला. याच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरनोबत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कारवाई दरम्यान आरोपींकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र एवढी मोठी कामगिरी करुन प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यांच्या निधनाला चार वर्षे उलटून गेली. आर्थिक मदत तर दुरच साधे पदक देखील त्यांना मिळाले नाही. पत्नी आणि दोन मुलांसोबत ते अंधेरीतील पोलीस लाईन येथे राहायचे.
त्यांच्या मृत्यूनंतर वडीलांना शौर्य पदत मिळावे म्हणून त्यांचा मुलगा विकास आणि पत्नी कविता या सतत शासन दरबारी पायपीट करत आहेत. गावंड आणि शिंदे यांच्या यादीत सरनोबत यांचेही नाव नोंदविण्यात येणारअसल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र शहीद कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदत यादीत त्यांचे नावच नसल्याने या कुटुंबियांचा लढा पुन्हा सुरुच राहीला. पतीने संपूर्ण आयुष्य पोलीस दलात अपर्ण केले. तरी देखील त्यांच्या हक्कासाठी झगडण्याची वेळ येणे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे सरनोबत यांच्या पत्नी कविता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दोन्ही कुटुंबियांना आर्थिक भरपाई
गावंड आणि शिंदे यांच्या दोन्ही कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई, सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत वेतन, महागाई भत्ता, वेतन आयोगानुसार सुधारित वेतन, निवासस्थान रिक्त केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान म्हणून १.५ लाख अथवा अंतिम वेतनाच्या २० पट सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
काय नाव त्यांचे : सरनोबत यांच्या नावाबाबत कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. फक्त दोनच नावे आली होती. त्यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. सरनोबतबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असे प्रशासन विभागाचे अनुप कुमार सिंह म्हणाले.
पोलिसांचा निधी गेला कुठे ?
मुंबईत जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. अशात गावंड यांच्या मत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांचा एक दिवसाचा वेतन देण्याचे जाहीर केले. अशात दलातील एका दिवसाचे वेतन आले की ही रक्कम कोटींच्या घरात जाते. अशात त्यांच्या कुटुंबियांना अवघे १० लाख रुपये देण्यात येत असल्याने बाकीचा निधी गेला कुठे ? असा सवाल येथे उपस्थित होत आहे.