कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत आकडेवारी लपवली जातेय का?; आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:42 PM2021-06-11T22:42:50+5:302021-06-11T22:43:24+5:30

Coronavirus : राज्य सरकार आकडेवारी लपवत असल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांनंतर आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण.

Are statistics on corona patient and death numbers hidden Explanation from the Department of Health | कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत आकडेवारी लपवली जातेय का?; आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत आकडेवारी लपवली जातेय का?; आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य सरकार आकडेवारी लपवत असल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांनंतर आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण.

कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची  माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

केवळ  तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे

कशी आहे कोरोना माहिती संकलन पद्धती?

  • केंद्र शासन कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टल वापरते.
     
  • आयसीएमआरचे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल ( बाधित रुग्णांच्या माहितीसाठी)
     
  • कोविड १९ पोर्टल (मृत्यूच्या माहितीसाठी)
     
  • या शिवाय प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.
     
  • प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आरटीपीसीआर ॲपद्वारे आयसीएमआरचे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टलवर भरत असते.
     
  • राज्याच्या दैनंदिन अहवालासाठी रोज रात्री बारा वाजेपर्यंतची बाधित रुग्णांची यादी आयसीएमआरच्या सी. व्ही.अनालिटिक्स पोर्टल वरुन, तर मृत्यूची यादी कोविड १९ पोर्टल राज्य आणि जिल्हास्तरावर डाउनलोड करण्यात येते.
     
  • राज्य आणि जिल्हास्तरावर दुहेरी नोंदी असलेले रुग्ण वगळण्यात येतात. या यादीतील माहितीची खातरजमा करणेबाबत सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार बाधित रुग्ण आणि  मृत्यू बाबत माहितीची खातरजमा करुन साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांची अंतिम माहिती राज्य कार्यालयास प्राप्त होते. या माहितीच्या आधारेच राज्याचा अंतिम अहवाल आणि प्रेस नोट तयार केली जाते.
     
  • रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.

    माहितीतील तफावतीची कारणे
  • प्रत्येक हॉस्पिटलने त्यांच्याकडील रुग्णांची माहिती वेळेवर भरावी अद्ययावत करावी यासाठी प्रत्येक रूग्णालयाला फॅसिलिटी ॲप ही ऑनलाईन सेवा पुरवण्यात आलेली आहे. तथापि अनेक रुग्णालये, विशेषतः खाजगी रुग्णालये या फॅसिलिटी ॲपवर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती अद्ययावत करत नाहीत. त्यामुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले अथवा किती जणांचा मृत्यू झाला याबाबत रियल टाइम डेटा मिळण्यामध्ये अडचणी येतात.
     
  • हॉस्पिटलस्तरावरुन विलंब झाल्यास जिल्हास्तरावर ही माहिती संकलित करून ती कोविड पोर्टलवर अपलोड केली जाते. परंतु या प्रक्रियेमध्ये अनेकदा बराच वेळ लागतो.यामुळे काही मृत्यूची माहिती बर्याच कालावधी करता प्रलंबित राहते.
     
  • आयसीएमआर पोर्टल वर प्रयोगशाळा आपली माहिती भरतात. परंतु अनेकदा प्रयोगशाळाकडील तपासलेल्या नमुन्यांची सर्व माहिती वेळेवर भरली जात नाही. तपासलेल्या नमुन्याबाबत माहिती प्रलंबित राहिली तर ते पॉझिटिव्ह रुग्ण पोर्टलवर दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांच्या डिस्चार्ज किंवा मृत्यू विषयक माहिती देखील वेळेत भरण्यामध्ये अडचणी येतात.
     
  • दोन पोर्टल मधील माहिती एकत्रित होण्यासाठी लागणारा वेळ (Synchronization)  आणि इतर तांत्रिक कारणामुळे देखील माहितीमध्ये तफावत आढळते.
     
  • राज्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये रुग्णांची संख्या खूप जास्त होती. या कालावधीत जिल्ह्यांची सर्व यंत्रणा रूग्ण व्यवस्थापन, खाटांचे व्यवस्थापन ऑक्सिजन व औषध पुरवठा या बाबींमध्ये व्यस्त असल्यामुळे या काळातील नोंदी या प्रलंबित राहिलेल्या असून जिल्हा व रुग्णालय स्तरावरून त्याचे अपडेशन सध्या करण्यात येत आहे.
     

Web Title: Are statistics on corona patient and death numbers hidden Explanation from the Department of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.