बिटकॉइन घोटाळ्यात तुमचा सहभाग आहे का ? भाजपचा सुळे, पटोलेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:03 AM2024-11-20T09:03:49+5:302024-11-20T09:04:42+5:30
बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला.
मुंबई/नवी दिल्ली : बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रपरिषदेत दिले. सुळे यांनी मात्र यात सहभाग नसून, याबद्दल आपण सायबर क्राईमकडे तक्रार दिल्याचे म्हटले आहे.
त्रिवेदी यांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि काही चॅटिंग दाखवत पैसे दिले जात असल्याचा आरोप केला. त्रिवेदी म्हणाले की, या क्लिपमधील आवाज तुमचा आहे की नाही, असा सवालही त्रिवेदी यांनी सुळे आणि पटोले यांना केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी गौरव मेहता आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि सायबर क्राईमकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
त्रिवेदींचे आरोप निराधार आहेत. निवडणुकीच्या आदल्या रात्री खोटी माहिती पसरवली जात आहे. जनतेची फसवणूक करण्यासाठी खोटे आरोप केल्याबद्दल त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे, असेही सुळे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.