रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

By संतोष आंधळे | Published: September 12, 2022 08:50 AM2022-09-12T08:50:41+5:302022-09-12T08:51:12+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  

Aren't there people to fill the vacancies?; Only job announcement in public health department | रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

Next

कोरोना महासाथीसारखा महाभयंकर काळ पाहिल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कमालीचा बदल होईल असे अपेक्षित होते. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरली जाणार, अशी घोषणा करून मोठी वाहवा मिळविली होती. आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील १७,१०५ पदे अद्यापही रिक्त आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार, तर काही राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांची पदे आजही रिक्तच आहेत. कोरोनासारखे अनेक आजार भविष्यात येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.  

रिक्त पदांची संख्या लक्षणीय
सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  सहा सहसंचालक पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उपसंचालकाची एकूण २४ पदे आहेत, त्यापैकी ८ पदे महिनाभरापूर्वीच भरली आहेत. त्यापैकी काही जण ६-७ महिन्यांत निवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर आणखी  १२ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कार्यालयीन आणि प्रशासकीय कामासाठी लागणारी रिक्त पदांची संख्याही लक्षणीय आहे.  

आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सक्षमपणे लढणारा हा विभाग कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पांगळा झाला आहे. आरोग्य विभागाचे यामधील सर्वांत मोठे अपयश म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या नियोजनाची कमतरता येथे जाणवते. योग्य वेळेवर पदोन्नती नाही, त्यामुळे जो अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र आहे तो त्या हक्काच्या पदोन्नतीसाठी फाईल हातात मिरवत मंत्रायलयाच्या चकरा मारून बेजार होतो. लोकांना सोयीनुसार बदल्या दिल्या तर त्या आरोग्य व्यवस्थेला मानवी चेहरा लाभेल. वैद्यकीय अधिकाऱ्यालाच अमानवी पद्धतीने वागणूक दिली तर त्याच्या कामातून तो मानवी वागणूक देईल काय, हा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींचा थेट आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन गरीब रुग्ण यामध्ये भरडला जातो. अर्थपूर्ण बदल्या थांबल्या आणि योग्य पद्धतीने समुपदेशन करून अधिकाऱ्यांना पोषक वातावरण तयार करून काम करण्यास सांगितले तर ते आवडीने काम करतील, मात्र असे होताना दिसत नाही. या विभागात काही जण वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होतात आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त होतात. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका वेळेवर होऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसेल तर त्या कर्मचाऱ्याचे कामात  मन कसे रमेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

... तरच उत्साहाचे वातावरण
आरोग्य विभागात सगळेच काही वाईट चालले आहे असे नाही. तो आहे त्या व्यवस्थेत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक गोष्टी वेळेत पूर्ण होत नाही. रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश वर्ग हा सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असतो. 
त्यांना हक्काच्या आधार वाटणाऱ्या या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा दुष्काळ असल्यासारखी आजची परिस्थिती आहे,  तर नव्यानेच या आरोग्य विभागाची धुरा हातात घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना या मरगळलेल्या विभागाचे केवळ लसीकरण करून चालणार नाही तर त्याला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्साहाचे आणि आनंदी वातावरण विभागात तयार होऊ शकेल.  

Web Title: Aren't there people to fill the vacancies?; Only job announcement in public health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.