सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:00 AM2024-07-31T06:00:33+5:302024-07-31T06:00:55+5:30

आशिष देशमुख यांचा सहकार मंत्री वळसे-पाटील यांच्यावर आरोप

argument between bjp and ajit pawar group over saving sunil kedar | सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद

सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माजी मंत्री व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्याच्या सहकार खात्याकडून असल्याच्या आरोपामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजप व अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे.

केदार यांच्याकडून सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याची १५० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून याप्रकरणी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे सुनावणी निश्चित केली होती. ही सुनावणी अचानक रद्द झाली. वळसे-पाटील सुनील केदार यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वळसे-पाटील व केदार जुने सहकारी असल्यानेच या प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला. 

देशमुख यांच्यासह नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यामार्फत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देत तातडीने सुनावणी न झाल्यास २ ऑगस्टपासून सावनेरला ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. दोन महिन्यांत केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून शेतकरी आणि खातेदारांना पैसे वाटप करण्याची मागणी निवेदनात केली.  

वसुली करा : १५३ कोटींच्या जिल्हा बँक घोटाळ्यात केदार यांच्याकडून व्याजासह १,४४४ कोटी रुपये वसूल करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

प्रकृतीच्या कारणामुळे सुनावण्या पुढे ढकलल्या 

वळसे-पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने ते मंगळवारी पुण्यातच होते. त्यामुळे त्यांनी या दिवशी ठेवलेल्या सर्व सुनावण्या पुढे ढकलल्या. मंत्रीमंडळ बैठकीलाही ते येऊ शकले नाहीत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मतदारसंघातील विकास कामांबाबत आयोजित बैठकही रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 


 

Web Title: argument between bjp and ajit pawar group over saving sunil kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.