आरिफच्या माहितीने संभ्रमात वाढ

By admin | Published: December 2, 2014 04:34 AM2014-12-02T04:34:32+5:302014-12-02T04:34:32+5:30

आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी

Arif's information confused with astonishment | आरिफच्या माहितीने संभ्रमात वाढ

आरिफच्या माहितीने संभ्रमात वाढ

Next

डिप्पी वांकाणी, मुंबई
इस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेने इराक आणि सीरियात चालवलेल्या संघर्षातून परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिद याने दिलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा संभ्रमात पडल्या आहेत.
सुरुवातीला आपण संघटनेकडून दर आठवड्याला मिळणाऱ्या पैशातून काही पैसे साठवून तुर्कस्थानमार्गे निसटून भारतात परतलो, असे त्याने सांगितले होते. आता त्याने म्हटले आहे, की आयएस ही संघटना त्यांच्या लढवय्यांवर कोणतीही बंधने घालत नाही आणि त्यांना आपल्या मर्जीनुसार लढ्यात सामील होण्याची किंवा सोडून जाण्याची मुभा आहे. इतकेच नव्हे, तर आपल्याला संघटनेने परत येताना २,००० अमेरिकी डॉलर्स दिले आणि तुर्कस्थानच्या सीमेपर्यंत आणून सोडले, असेही आरिफने सांगितले.
आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी आहे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्या माहितीची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरिफवर लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येईल.
आरिफच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याचे कल्याणहून आलेले तीन साथीदार इराकमधील बगदादहून मोसूलला गेले. तेथे ते त्यांची ओळख किंवा शिफारस करून देणाऱ्या व्यक्तीला भेटले. त्यानंतर संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांची ओळख पटवून घेतली आणि माहिती तपासली. आरिफच्या म्हणण्यानुसार, ही संघटना कोणालाही शिफारशीशिवाय किंवा ओळखीशिवाय लढ्यात सहभागी करून घेत नाही. संघटनेच्या गोटात शिरल्यावर त्यांना तेथे अनेक आशियाई वंशाचे लोक भेटले. त्यापैकी बहुसंख्य लोक पाकिस्तानी असल्याचे त्यांची भाषा आणि उच्चारांवरून लक्षात आले. युद्धक्षेत्रात हवाई आणि अन्य हल्ल्यांत अनेक जण मारले जात असल्याने दर शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर संघटनेच्या जिवंत लढवय्यांची मोजदाद केली जाते. त्याचवेळी नव्या लढवय्यांची भरती केली जाते. तसेच एखाद्याने परत जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला जाऊ दिले जाते.
मात्र तपास यंत्रणा या माहितीवर सहजासहजी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे, की या संघटनेने आजवर दाखवलेली अमानुषता लक्षात घेता, ती आपल्या लढवय्यांना इतक्या सहजासहजी सोडणे शक्य नाही. तसेच आरिफने आपण कसे जखमी झालो याची कारणेही वेगवेगळी दिली आहेत. प्रथम त्याने सांगितले, की आपण प्रशिक्षणादरम्यान गोळी लागून जखमी झालो. नंतर तो म्हणाला, की त्याला खिडकी साफ करताना गोळी लागली. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की एखादा माणूस युद्धक्षेत्राच्या ऐन रणधुमाळीत खिडक्या कशाला पुसत बसेल. या सर्व प्रश्नांचा खुलासा आरिफच्या लाय डिटेक्टर चाचणीतून होण्याची शक्यता आहे.

Web Title: Arif's information confused with astonishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.