आरिफला ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
By admin | Published: December 18, 2014 05:33 AM2014-12-18T05:33:28+5:302014-12-18T05:33:28+5:30
इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण येथील आरिफ माजिद याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत
मुंबई : इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण येथील आरिफ माजिद याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेने विशेष न्यायालयात केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरिफला ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़
आरिफच्या पोलीस कोठडीची मुदत २२ डिसेंबरला संपत असताना त्याआधीच एनआयएने स्वत: त्याला न्यायालयात हजर करून त्याची चौकशी संपली असल्याचे जाहीर केले़ विशेष न्यायाधीश यतीन डी़ शिंदे यांच्यासमोर आरिफला हजर करण्यात आले़
त्यावेळी त्याच्या वकिलाने ही अर्ज करून आरिफच्या नातेवाईकांना कारागृहात भेटू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली़ तसेच आरिफला काहीही कबूल करायचे नसून तो निर्दोष आहे, असा दावाही त्याच्या वकिलाने केला़ या अर्जाची न्यायालयाने नोंद करून घेतली़ मे महिन्यात धार्मिक यात्रेला गेलेला आरिफ व त्याचे मित्र अतिरेकी संघटनेत सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली़ अखेर अरीबला भारतात आणायला गुप्तचर संघटनेला यश आले़