खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 06:04 PM2019-07-06T18:04:51+5:302019-07-06T18:05:50+5:30
अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षादेशाच्या विरोधात जाण्याच्या तयारी करणारे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण दानवेंना आव्हान देणारच अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. परंतु, हा वाद मिटविण्यासाठी काय साटेलोटे झाले हे अद्याप कळू शकले नाही.
राज्यमंत्री असलेले खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. खोतकर यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी जालना जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्वत: कडे ठेवली. एकमेकात विस्तवही जात नसताना खोतकर यांनी लोकसभेला दानवे यांचे काम केले. दानवे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांच माझ्यावर इश्क असं संबोधले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
विधानसभेला जालना मतदार संघात खोतकर यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांचे तगडे आव्हान आहे. २०१४ मध्ये खोतकर केवळ २९६ मतांच्या फरकाने विजय झाले होते. खोतकर यांना पोस्टल मतांनी तारल्याचे सांगण्यात येते. खोतकर यांना राज्यमंत्रीपदामुळे जालन्यात शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळाली असली तरी जालना नगरपरिषद गोरंट्याल यांच्याकडे असल्याने खोतकर यांच्यासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक खोतकर यांच्यासाठी वाटते तितकीशी सोपी नक्कीच नसणार हे स्पष्टच आहे.
दरम्यान दानवे यांना केलेली मदत खोतकर यांच्यासाठी पथ्यावर पडू शकते. परंतु, यासाठी उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय साटेलोटे झाले या प्रश्नाचं उत्तर कदाचित विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असं दिसतय.