बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 04:58 AM2016-12-23T04:58:38+5:302016-12-23T04:58:38+5:30
शेजारीच राहणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या एका नराधमाला बोईसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत
बोईसर : शेजारीच राहणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या एका नराधमाला बोईसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जुन्नर येथे अटक केली. त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बोईसर येथील ५४ वर्षीय नराधमाने त्याची पत्नी गावाला गेल्याची संधी साधून शेजारच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर सोमवारी दुपारी अत्याचार केला होता. दुपारी ही बालिका कुठे गेली आहे यासंदर्भात दुसऱ्या शेजारी राहणाऱ्या एका बाईने पीडित बालिकेच्या आईला विचारले असता ती बाहेर खेळत असेल असे समजून पाहण्यास बाहेर आलेल्या आईला मुलगी दिसली नाही. म्हणून तिने शेजारच्यांचा दरवाजा ठोठावला असता ती झोपली आहे. नंतर येईल असे उत्तर दरवाजा न उघडता आतून मिळाले.
झोपली असली तरी बालिकेला देण्याचा आग्रह आईने धरल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा ती बालिका रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिची अवस्था पाहताच अत्याचार झाल्याची शंका आल्याने तिला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर तिला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यांत आले होते.
दरम्यान, या नराधमाने तडक आपले गाव गाठले. परंतु बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग नाळे, सहायक फौजदार जयवंत बिडवाई व पोलीस नाइक दीपक राऊत यांच्या टीमने त्याला जुन्नर येथून पकडून आणले. (वार्ताहर)