महिलांच्या सुरक्षेसाठी फिरते सशस्त्रपथक
By admin | Published: July 21, 2016 02:11 AM2016-07-21T02:11:26+5:302016-07-21T02:11:26+5:30
तालुक्यात विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी फिरते सशस्त्र पथक नियुक्त करण्यात येईल,
वडगाव मावळ : तालुक्यात विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी फिरते सशस्त्र पथक नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
कोपर्डी (अहमदनगर) येथील गरीब कुटुंबातील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने निषेध करून दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करून न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा उपाध्यक्ष अतुल वायकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी सरपंच संघटना अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तानाजी शेडगे, लहू वाडेकर, पांडुरंग गरुड, किशोर ढोरे, विकास सातकर, मोहित कदम, चंद्रकांत भुंडे, प्रतीक पिंजण, रमेश भुरूक व कार्यकर्ते उपस्थित होते.
वायकर म्हणाले, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे शासनाचा नाकर्तेपणा दिसत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी शासनाने कायद्याची जनजागृती करून गुन्हेगारांना कडक शासन करावे. तालुक्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात सशस्त्र महिला व पुरुष पोलीस गस्त सुरू करून विद्यार्थिनी व महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी. तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, निवेदनातील मागणी शासनाकडे पाठविण्यात येईल. शाळा व महाविद्यालयात ठेवलेल्या सूचना पेटीत तक्रारी टाका किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
प्रास्ताविक पडवळ यांनी, सूत्रसंचालन पिंजण यांनी केले. आभार कदम यांनी मानले. (वार्ताहर)