सेनेचा पुन्हा पाकविरोधीराडा

By admin | Published: October 20, 2015 04:33 AM2015-10-20T04:33:21+5:302015-10-20T04:37:39+5:30

भारत-पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामने आयोजित करण्यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेली बैठक शिवसैनिकांनी उधळून लावली.

Army Against Anti-Resistance | सेनेचा पुन्हा पाकविरोधीराडा

सेनेचा पुन्हा पाकविरोधीराडा

Next

मुंबई : भारत-पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामने आयोजित करण्यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेली बैठक शिवसैनिकांनी उधळून लावली. यामुळे या बैठकीकरिता मुंबईत दाखल झालेले पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान दिल्लीला रवाना झाले. गझलनवाज गुलाम अली यांच्या मैफिलीस विरोध, पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून झालेली शाईफेक आणि आज बीसीसीआयच्या कार्यालयात राडा करून शिवसेनेने सरकारपुढे आव्हान निर्माण केल्याने सेनेच्या या ‘उपद्रवी मूल्या’ची सरकार कशी दखल घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मुंबईवर २६-११चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झालेला नाही. या देशांमधील क्रिकेट सामने यूएई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसमोर ठेवला होता. यासंदर्भात वानखेडे स्टेडियम येथील ‘क्रिकेट सेंटर’ या बीसीसीआयच्या कार्यालयात सोमवारी सकाळी बैठक होणार होती. त्याकरिता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान व सचिव नजिम सेठी हे मुंबईत दाखल झाले होते. या बैठकीपूर्वी सकाळी १०च्या सुमारास १०० ते १५० शिवसैनिक वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआय कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी जमा झाले. त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘पाकिस्तान हाय हाय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘शहरयार खान चले जाव’ अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्ताला असलेले हाताच्या बोटावरील पोलीस व खासगी सुरक्षा रक्षक यांना न जुमानता शिवसैनिक आत घुसले व त्यांनी घोषणा देत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या दालनात शिरून तुफान घोषणाबाजी केली. मनोहर यांनी शिवसैनिकांना चर्चा करण्याची सूचना केली व बैठकीला विरोध न करण्याचे आवाहन केले. मात्र शिवसैनिकांनी पाकशी चर्चा अथवा क्रिकेट काहीच नको, असा पवित्रा घेतला. बैठकीच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलात शहरयार खान यांचे वास्तव्य होते. शिवसैनिकांच्या निदर्शनानंतर त्या पंचतारांकित हॉटेल परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली.
शिवसेनेच्या या दांडगाईमुळे बीसीसीआयची बैठक आता दिल्लीत होणार असून, शहरयार खान हे दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)

‘शिवसेनेला दहशतवादी संघटना जाहीर करा’
पाकिस्तान आणि पाक नागरिकांच्या विरोधात शिवसेनेने भारतात चालविलेल्या हिंसक कारवाया पाक सरकारने संयुक्त राष्ट्र संघाच्या निदर्शनास आणून शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करून घ्यावे, अशा प्रकारचा ठराव पाकच्या पंजाब प्रांतीय विधानसभेत मांडण्यात आला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रातीय विधिमंडळ सदस्य फैजा मलिक यांनी अशा प्रकारच्या ठरावाची सूचना सोमवारी विधिमंडळ सचिवालयाला दिली.

पंच अलिम दार ‘आऊट’... शिवसेनेच्या धमकीनंतर पाकचे पंच अलिम दार यांना भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान गुरुवार २२ आॅक्टोबर रोजी चेन्नईत होणाऱ्या चौथ्या तसेच रविवारी २५ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या पाचव्या सामन्यातून पंच म्हणून वगळण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

पोलिसांची बेफिकिरी
बीसीसीआयच्या कार्यालयात शिवसैनिक घुसल्याची खबर पोलिसांना मिळाल्यावर मग पोलिसांची कुमक तेथे दाखल झाली. बीसीसीआय कार्यालयात घुसलेल्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्याकरिता पोलिसांची धावपळ झाली.
पोलीस दाखल झाल्याची खबर मिळताच बहुतांश शिवसैनिकांनी सुबाल्या केल्या; तर १० ते १५ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली व सायंकाळी त्यांची जामिनावर मुक्तता केली. गुलाम अली, कसुरी यांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी व्यत्यय आणल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीकरिता कडेकोट बंदोबस्त का दिला गेला नाही? शिवसैनिकांना बीसीसीआय कार्यालयात घुसखोरी करण्याची संधी कशी दिली गेली, असे सवाल त्यामुळे उपस्थित झाले आहेत.

अटक केलेल्या शिवसैनिकांची नावे
शैलेश सरवाय (वय ४५), विजय मांजरेकर (३८), विलास खोत (४५), रमाकांत भोसले (६३), प्रदीप चेऊलकर (५३), सतीश खोत (३२), मिलिंद जोरे (२२), अनिल जाधव (२८), दिलीप वानखेडे (४५) आणि महेश गुलगुले (३८) यांना भादंवि कलम १४१, १४३, १४९, ३७ (१) व मुंबई पोलीस कायदा १५३ अन्वये पोलिसांनी अटक केली. प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली असून, अन्य काही जणांचा शोध सुरू असल्याचे मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले.

शिवसेनेच्या आतापर्यंतच्या भूमिकेला सुसंगत अशीच कृती शिवसैनिकांनी केली आहे. भारत-पाक सामन्यांच्या मुंबईतील बैठकीस विरोध होणार हे माहीत असतानाही अशी बैठक आयोजित करून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ का चोळले? बीसीसीआयने स्वत:हून ओढवून घेतलेला हा प्रकार आहे.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना

Web Title: Army Against Anti-Resistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.