सेना -काँग्रेसची स्थायीसाठी युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 01:30 AM2017-03-23T01:30:22+5:302017-03-23T01:30:22+5:30

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिवसेनेने अखेर काँग्रेसबरोबर युती करून स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्याचे स्पष्ट

Army: Alliance for the permanent seat of the Congress | सेना -काँग्रेसची स्थायीसाठी युती

सेना -काँग्रेसची स्थायीसाठी युती

Next

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिवसेनेने अखेर काँग्रेसबरोबर युती करून स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीच्या अपेक्षेत असलेल्या भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. एकूणच तीन नगरसेवकांच्या जोरावर आता काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेसने मिळून एक गट आता तयार केला असून त्यासंदर्भातील पत्र कोकण विभागीय आयुक्तांना बुधवारी देण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिवसेनेच्या तीन स्वीकृत सदस्यांमध्ये एका काँग्रेसच्या सदस्याचादेखील नंबर लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे अवघे तीन नगरसेवक निवडून आल्यानंतरही काँंग्रेसला एकाच वेळेस स्थायी आणि स्वीकृतपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीबरोबर निवडणुकीपूर्वी असलेली आघाडी निवडणुकीनंतर काँग्रेसने तोडली आहे. त्यांनी आपल्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला देत ठाणे महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसच्या ७० नगरसेवकांचा एक वेगळा गट तयार केला आहे. ठाणे महापालिकेत काँग्रेस शिवसेनेच्या गटात सामील झाल्याचे पत्र काँग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे. शिवसेनेबरोबर गेल्याने आता काँग्रेसला सत्तेतील काही पदे मिळण्याची शक्यता आहे. परंतु,राष्ट्रवादीबरोबर राहिल्यास ते मिळणे शक्य नसल्याची खात्री काँग्रेसला होती. परिणामी, त्यांनी सत्ताधारी शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला आहे. तरीसुद्धा, स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून ही नवी राजकीय समीकरणे जुळवण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी धरून शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. गेल्या वेळेस ज्या पद्धतीने आठआठ सदस्य असताना लॉटरीपद्धतीने स्थायीचे सभापतीपद लोकशाही आघाडीच्या वाट्याला गेले होते. तसे होऊ नये म्हणून सेनेने खबरदारी घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Army: Alliance for the permanent seat of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.