सेना-भाजपा ‘एकीचे बळ’ अधिक ठरले असते
By admin | Published: October 24, 2014 04:20 AM2014-10-24T04:20:02+5:302014-10-24T04:20:02+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. एका विश्लेषणानुसार, हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुका लढले असते, तर त्यांना आणखी ५३ जागा जिंकता आल्या असत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झाली असती. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या पारड्यातही कमी जागा पडल्या असत्या.
भाजपा- मित्रपक्षांनी १२३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आहेत. दोघांनी मिळून जिंकलेल्या जागांची संख्या १८६ आहे. या दोन्ही पक्षांचे मताधिक्य पडताळून पाहाता ५३ जागांवर त्यांनी परस्परांना क्षय दिले आहेत. म्हणजेच महायुती असती, तर त्यांना २३९ जागांवर आघाडी घेता आली असती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून ४२ आणि ४१ म्हणजेच एकूण ८३ जागा मिळविल्या आहेत. हे पक्ष एकत्र लढले असते, तर त्यांना यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असत्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सेना-भाजपाच्या युतीला अहमदनगर आणि ऐरोली या जागा सहज जिंकता येणे शक्य होते. तसेच मनसेने जिंकलेली एकमेव जुन्नरची जागा आणि एमआयएमने जिंकलेली औरंगाबादची जागाही युतीच्या उमेदवारांना जिंकता आली असती. तसेच जत, करमाळा या जागाही महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकता आल्या असत्या. (प्रतिनिधी)