सेना-भाजपात संघर्षाची दरी आणखीन वाढणार?
By admin | Published: November 26, 2014 09:20 PM2014-11-26T21:20:02+5:302014-11-26T21:20:02+5:30
युतीमधील दुरावलेले संबंध जुळण्यातील मोठा अडथळा जैतापूर प्रकल्प ठरु शकतो
राजापूर : कोकणातील आपल्या आभार दौऱ्यादरम्यान सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध असलेला विरोध कायम असल्याचे ठणकावून सांगितले. या विषयावरुन सेना-भाजप दरम्यान संघर्षाची चिन्हे आहेतच, शिवाय सेनेला राज्य मंत्रिमंडळात सहभाग घेताना अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे.शिवसेनेचा जैतापूर प्रकल्प असलेला विरोध उघड आहे, तर आजवर त्याबाबत ‘ब्र’ न काढणाऱ्या भाजपने राज्यात सत्तेवर आल्यानंतर आपली वाघनखे बाहेर काढताना जैतापूर प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. केंद्रातील भाजप सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून राहणाऱ्या शिवसेनेने राज्यात भाजपशी पंगा घेऊन विधिमंडळात वेगळी चूल मांडताना विरोधी पक्षात बसून भाजपवर हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली मूळ भूमिका स्पष्ट करत असलेला विरोध सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान जाहीर केला आहे. युतीमधील दुरावलेले संबंध जुळण्यातील मोठा अडथळा जैतापूर प्रकल्प ठरु शकतो. (प्रतिनिधी)