सेना-भाजपा युतीचा नारळ सिंधुदुर्गात फुटला?

By admin | Published: February 27, 2017 11:58 PM2017-02-27T23:58:08+5:302017-02-27T23:58:08+5:30

शिवसेना आणि भाजपाची युती कधी होते याची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत

Army-BJP coalition cobbled in Sindhudurg? | सेना-भाजपा युतीचा नारळ सिंधुदुर्गात फुटला?

सेना-भाजपा युतीचा नारळ सिंधुदुर्गात फुटला?

Next

 ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 - महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचे दंड थोपटत मैदान लढवणाऱ्या शिवसेना आणि भाजपाची युती कधी होते याची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य ठिकाणी युती होणार का याची उत्सुकता लागलेली असतानाच युतीचा नारळ सिंधुदुर्गात 'स्थानिक पातळीवर' फुटला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य फुटून कॉँग्रेस पक्षात सामील होऊ नयेत यासाठीची खबरदारी म्हणून शिवसेना तसेच भाजपा या पक्षांनी काही ठिकाणी वैयक्तिक तर काही ठिकाणी युतीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर गट स्थापन केले आहेत. या गटांमध्ये जिल्हा परिषद तसेच कुडाळ आणि सावंतवाडी पंचायत समित्यांसाठी शिवसेना सदस्यांचे गट तर देवगड, वैभववाडी आणि वेंगुर्ला या पंचायत समित्यांसाठी शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून गट स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेत शिवसेनेने आपल्या गतनिवडणुकीतील चार या सदस्यसंख्येवर १६ एवढा आकडा गाठला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये १० जागा जिंकत शिवसेनेने याठिकाणी स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र देवगड, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि वैभववाडी या पंचायत समित्यांमध्ये युतीविना सत्ता स्थापन करणे सेना किंवा भाजपला अशक्य आहे. त्यामुळे या पंचायत समित्यांमध्ये युती करून सत्ता प्रस्थापित करण्याचे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी निश्चित केले आहे. त्यासाठी गटाची स्थापनाही करण्यात आली आहे.
सन २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले होते. यापैकी दोन सदस्य कॉँग्रेसमध्ये येऊन दाखल झाले होते, याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच पक्षांतरबंदी कायदा लागू झालेला असतानाही खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने तसेच भाजपानेही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य गट स्थापन केले आहेत.
नागेंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सेना गट
नवनिर्वाचित १६ शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांचा गट सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर स्थापन करण्यात आला. या गटनेतेपदी नागेंद्र शामसुंदर परब यांची निवड करण्यात आली आहे. तर कुडाळ पंचायत समितीमधील शिवसेनेच्या दहाही सदस्यांचा कुडाळ पंचायत समिती सदस्य गट श्रेया चंद्रकांत परब यांच्या गटनेतेपदी स्थापन करण्यात आला आहे.
देवगड, वेंगुर्ला, वैभववाडीत युती
देवगड, वेंगुर्ला आणि वैभववाडी या तीनही पंचायत समित्यांमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा व शिवसेना पक्षांनी युती करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. तसे पत्रही मंगळवारी या दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी दिले आहे.
देवगड पंचायत समितीमधील सेना-भाजपच्या मिळून आठही सदस्यांचा ‘देवगड तालुका विकास आघाडी’ नावाने भाजपचे सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांच्या नेतृत्वाखाली गट स्थापन करण्यात आला आहे. तर वेंगुर्ला पंचायत समितीसाठी सेनेचे सुनिल मधुकर मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यांचा सेना-भाजप पंचायत समिती गट स्थापन करण्यात आला आहे.
त्याचबरोबर भाजपच्या वैभववाडी सदस्या लक्ष्मी पुरुषोत्तम रावराणे यांच्या नेतेपदाखाली या पंचायत समितीतील ३ सदस्यांचा सेना-भाजप पंचायत समिती विकास गट स्थापन करण्यात आला आहे.
त्याचबरोबर शिवसेनेने आपल्या सावंतवाडी पंचायत समितीमधील चार सदस्यांचा गट सेनेचे रुपेश गुरुनाथ राऊळ यांच्या नेतेपदाखाली स्थापन केला आहे.  या तालुक्यांच्या गटानंतर आता दोडामार्ग पंचायत समितीमधील भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन अशा पाचहीजणांचा गट लवकरच तयार होऊन त्या गटाचेही पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी सादर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) 
 

Web Title: Army-BJP coalition cobbled in Sindhudurg?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.