‘रेसकोर्स’साठी सेना-भाजपात शर्यत
By Admin | Published: March 22, 2017 02:37 AM2017-03-22T02:37:32+5:302017-03-22T02:37:32+5:30
महालक्ष्मी रेसकोर्ससाठी वेगळे धोरण आणून शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी थीम पार्क संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे मनसुबे आखले आहेत.
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्ससाठी वेगळे धोरण आणून शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी थीम पार्क संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे मनसुबे आखले आहेत. मात्र मूठभर धनदांडग्यांच्या घोडे शर्यतीची हौस भागवण्यासाठी भाजपाची धडपड सुरू असून थीम पार्क होणारच, असा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपातील शर्यत पुन्हा तेजीत आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवरील संस्थेचा भाडेकरार संपला असल्याने या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बनविण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र भाजपा सरकारने भाडेकराराचे नूतनीकरण करताना महालक्ष्मी रेसकोर्सचे अधिकार आपल्याकडे राखून ठेवले आहेत. अशी नवीन तरतूद असलेली अधिसूचना काढून भाजपा सरकारने शिवसेनेची कोंडी केली आहे. मात्र भाजपाच्या या खेळीला प्रत्युत्तर देत थीम पार्क होणारच, असे शिवसेनेने ठणकावले आहे. तर १६० भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करताना त्यातील एक भूखंड घोड्यांच्या शर्यतीसाठी भाजपा देऊ शकते, मात्र धनदांडग्यांच्या घोडे शर्यतीसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा देण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर महापालिकेच्या मालकीच्या ३० टक्के व राज्य सरकारच्या अखत्यारीतील ७० टक्के जागेवर थीम पार्कच उभारावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
तीन वर्षे प्रस्ताव धूळ खात
कराराचा भंग करणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सचा ताबा असलेल्या मेसर्स रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबने कराराचा भंग केला. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र हा प्रस्ताव गेली तीन वर्षे सरकार दरबारी धूळ खात आहे. (प्रतिनिधी)