सेना-भाजपात सत्तेसाठी रस्सीखेच

By Admin | Published: November 3, 2015 04:11 AM2015-11-03T04:11:26+5:302015-11-03T04:11:38+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष होत शिवसेनेने केडीएमसीच्या गडावर

Army-BJP rope for power | सेना-भाजपात सत्तेसाठी रस्सीखेच

सेना-भाजपात सत्तेसाठी रस्सीखेच

googlenewsNext

कल्याण/डोंबिवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष होत शिवसेनेने केडीएमसीच्या गडावर वर्चस्व सिद्ध केले असले तरी त्यांना सत्तेसाठी नऊ जागांचा टेकू लागणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या ४२ जागा मिळालेल्या भाजपाने आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्याने सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यात केवळ ९ जागा मिळवलेली मनसे मात्र किंगमेकर ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकूण १२२ जागांपैकी दोन ठिकाणी मतदारांनी बहिष्कार घातला होता. तर तीन जागांवर बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे १२० जागांपैकी शिवसेना ५२, भाजपा ४२, मनसे ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, एमआयएम १, बसपा १ तर अपक्ष ९ असे उमेदवार विजयी झाले. केडीएमसीत एमआयएमने एका जागेसह आपले अस्तित्व सिद्ध केले, हे विशेष. सेनेला मनसेचा टेकू मिळाला तर बहुमताचा ६१ जागांचा जादूई आकडा गाठणे त्यांना शक्य होईल. मात्र ४२ जागा मिळवणाऱ्या भाजपाने मनसे, अपक्ष यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेकरिता प्रयत्न सुरू केल्याचे समजते. भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पलावा येथील निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली. परंतु, रात्री उशिरापर्यंत सत्तेचे गणित कुठेही जुळले नव्हते.

अन् उद्धव माघारी फिरले
कल्याण-डोंबिवलीत भाजपाला तडीपार करीत शिवसेनेने एकहाती विजय मिळविल्याबद्दल सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे वाहिन्यांवर बाईट देत असल्याचे पाहिल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डोंबिवलीकडे यायला निघाले होते. मात्र रस्त्यात असताना शिवसेना बहुमतापासून चांगलीच दूर असल्याचा निरोप मिळाल्याने ठाकरे माघारी फिरले, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना आपण डोंबिवलीकडे येत असून, दुर्गाडी किल्ला व डोंबिवलीतील गणेश मंदिरात दर्शनाला जायचे, असा निरोप दिला. त्यानुसार उद्धव हे तयार होऊन घराबाहेर पडले. त्यांचा ताफा वांद्रे सोडून डोंबिवलीच्या दिशेने निघाला असताना शिंदे यांनी सेनेची गाडी ५० जागांवर अडकल्याचा निरोप दिल्याचे कळते. त्यामुळे यू टर्न घेऊन ठाकरे पुन्हा ‘मातोश्री’कडे रवाना झाले.

मनसे ठरणार किंगमेकर...
मागील निवडणुकीत २८ जागा मिळूनही मनसेची भूमिका निर्णायक स्वरूपाची नव्हती. या वेळी मनसेला मोठा फटका बसून त्यांचे संख्याबळ
९ जागांवर आले असले तरीही सेनेला बहुमत प्राप्त करण्यास मनसेच्याच नाकदुऱ्या काढाव्या लागतील. भाजपाने सत्ता काबीज करण्याचे ठरवले तर मनसेच्या सहकार्याखेरीज पाऊलही टाकता येणार नाही.

नगरपालिकेचा प्रस्ताव थंड्या बस्त्यात
कडोंमपा महापालिका हद्दीत समावेश झालेल्या व नंतर वगळण्याचे आश्वासन दिलेल्या २७ गावांचा प्रश्न गाजला. या गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यावरून तेथील संघर्ष समिती व शिवसेना यांच्यात संघर्ष झाला. निकालानंतर या गावांतील संघर्ष समितीचे ५, भाजपाचे ६, शिवसेनेचे ५ तर मनसेचा १ नगरसेवक विजयी झालेला आहे. त्यामुळे आता नगरपालिका स्थापन करण्याचे विपरीत राजकीय परिणाम भाजपालाच भोगावे लागणार असल्याने संघर्ष समितीला ‘उपमहापौर’पद देऊन नगरपालिका स्थापनेचा प्रस्ताव थंड्या बस्त्यात टाकला जाण्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या चांगल्या कामांची पावती जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिली आहे. कल्याण-डोंबिवली व कोल्हापुरात आमच्या जागा जवळपास पाचपट वाढल्या. नगरपंचायतींमध्ये किमान ३१ ठिकाणी आम्ही सत्तेत येऊ.
- रावसाहेब दानवे
(प्रदेशाध्यक्ष, भाजपा)

राज्यातील जनतेने फडणवीस सरकारच्या विरोधातील संताप निकालाद्वारे व्यक्त केला आहे. वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते भाजपा आणि शिवसेनेला कायम राखता आलेली नाहीत. महापालिका आणि नगरपंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक २४५ जागा जिंकल्या आहेत.
- खा. अशोक चव्हाण
(प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

पक्षीय बलाबल
कल्याण-डोंबिवली
२०१०२०१५
शिवसेना३१५२
भाजपा०९४२
मनसे २८०९
आघाडी २९०६
अपक्ष १0०९
बसप-०१
एमआयएम -०१
एकूण१०७१२०

बहुमताची समीकरणे
शिवसेना ५२ + भाजपा ४२ = ९४
शिवसेना ५२ + मनसे ९ = ६१
भाजपा ४२ + संघर्ष समिती ५ +
मनसे ९ + काँग्रेस ४ + अपक्ष १ = ६१
(काँग्रेसचे सदस्य तटस्थ राहूनही भाजपाला मदत करू शकतात.)

Web Title: Army-BJP rope for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.