सेना भवन होते ‘टार्गेट’

By admin | Published: February 13, 2016 03:57 AM2016-02-13T03:57:27+5:302016-02-13T03:57:27+5:30

शिवसेनाप्रमुख हे सुरुवातीपासूनच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे ‘लक्ष्य’ होते. हे आता अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या साक्षीने स्पष्ट झाले आहे. २६/११च्या हल्ल्यापूर्वी

Army building was 'Target' | सेना भवन होते ‘टार्गेट’

सेना भवन होते ‘टार्गेट’

Next

मुंबई : शिवसेनाप्रमुख हे सुरुवातीपासूनच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे ‘लक्ष्य’ होते. हे आता अमेरिकेचा
नागरिक डेव्हिड हेडलीच्या साक्षीने स्पष्ट झाले आहे. २६/११च्या हल्ल्यापूर्वी
२००७मध्ये हेडलीने ‘शिवसेना भवन’चे आतून व बाहेरून चित्रीकरण केले होते. भविष्यात शिवसेना भवन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट होता, असा गौप्यस्फोट हेडलीने शुक्रवारच्या सुनावणीवेळी केला.
अमेरिकेच्या अज्ञात स्थळावरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सलग चौथ्या दिवशी डेव्हिड हेडलीने मुंबईच्या
विशेष मोक्का न्यायालयात साक्ष
नोंदवली. अमेरिकन नागरिक डेव्हिड
हेडली २६/११च्या मुंबईच्या हल्ल्यात माफीचा साक्षीदार आहे. बाळासाहेब
ठाकरे यांच्याबरोबरच मुंबईचे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी), नौदलाचा हवाई तळ हेदेखील
लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयचे ‘टार्गेट’ होते. याशिवाय दिल्लीचे
नॅशनल डिफेन्स कॉलेजही (एनडीसी) ‘लष्कर’ आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांच्या रडारवर होते, अशी माहिती हेडलीने न्यायालयात दिली.
हेडलीने साक्षीदरम्यान अनेक गौप्यस्फोट करून पाकिस्तान, आयएसआयचा बुरखा फाडला. शुक्रवारच्या सुनावणीवेळीही हेडलीने
२००७मध्ये दादरच्या सेना भवनची
आतून व बाहेरून रेकी करून व्हिडीओ शूट केल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘दादरच्या शिवसेना भवनात मी गेलो आहे. तेथे मी शिवसैनिक राजाराम रेगे यांच्याशी घनिष्ट संबंध निर्माण केले. रेगे यांनी परदेशी गुंतवणूकदारांना मुंबईत गुंतवणूक करण्यास सांगा, असे सांगितल्याचे त्याने न्यायालयात सांगितले.

हेडलीने ‘बीएआरसी’लाही दिली होती भेट
जुलै २००८मध्ये हेडलीने बीएआरसीला भेट दिली होती. साजिद मीरने हेडलीला तेथील एखादी व्यक्ती आयएसआयमध्ये भरती करण्याची सूचना केली होती.
जेणेकरून बीएआरसीची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून भविष्यात बीएआरसीही उडवता येईल, अशी मीरची कल्पना होती, असेही हेडलीने सांगितले.
नौदलाचे एअर स्टेशन आयएनएस शिक्राही दहशतवाद्यांच्या यादीत होते. त्याचीही रेकी डेव्हिडने केली होती.

व्हिडीओ आयएसआयला दाखविले
‘मी कोणाच्याही सांगण्यावरून शिवसेना भवनची रेकी केली नाही. मात्र सेना भवनची रेकी केल्यास ‘लष्कर’च्या उपयोगाची नक्कीच पडेल, हे मला माहीत होते. पाकला परत गेल्यावर मी हे व्हिडीओ ‘लष्कर’च्या साजिद मीर आणि आयएसआयचे मेजर इक्बाल यांना दाखवले. दोघेही खूश झाले. भविष्यात हे व्हिडीओ सेना भवन आणि त्यांचे नेते (बाळासाहेब ठाकरे) यांना मारण्यासाठी उपयोगी येतील, असे साजिद म्हणाल्याचे हेडलीने सांगितले.

देशभरातील छाबड हाउसची माहिती
२६/११च्या हल्ल्यानंतर हेडलीने ७ ते १७ मार्च २००९ या १० दिवसांत दिल्लीच्या एनडीसीचे व्हिडीओ शूट केले. त्याला अल-कायदाचा म्होरक्या इलियास काश्मिरी याने एनडीसीची रेकी करण्यास सांगून आर्थिक मदतही केली. त्याने मला एनडीसी व पुणे, गोवा, दिल्ली येथील छाबड हाउसची रेकी करण्यास सांगितले. मात्र छाबड हाउसपेक्षा एनडीसीची रेकी करण्यास प्राधान्य दे, असे त्याने मला बजावले होते.
मात्र याबद्दल मी ‘लष्कर’ला काहीच माहिती दिली नाही. कारण मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतातील वातावरण माझ्यासाठी सुरक्षित नव्हते. विशेषत: मी प्रसारमाध्यमांपासून वाचणे शक्य नव्हते म्हणून ‘लष्कर’ने मला भारतात येऊन दिले नसते. त्यामुळे मी त्यांना या रेकीविषयी काहीही कल्पना दिली नाही, अशी माहिती हेडलीच्या साक्षीद्वारे बाहेर आली आहे.

पत्नीकडून अभिनंदन
२६/११चा हल्ला यशस्वी झाल्यानंतर हेडली लाहोरला होता. तर त्याची पहिली पत्नी शाहजिया शिकागोमध्ये होती. तिने हा हल्ला यशस्वी झाल्याबद्दल हेडलीचे सांकेतिक भाषेत अभिनंदन केले. ‘ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याबद्दल तुझे (हेडली) अभिनंदन,’ असे शहाजिया हिने हेडलीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. त्यावर हेडलीने म्हटले की, मी चांगले मार्क मिळवण्यासाठी खूप मेहनत केली.

गेट वे आॅफ इंडियावरून अतिरेकी घुसणार होते : साजिद आणि मेजर इक्बाल यांनी दहाही अतिरेक्यांसाठी मुंबईत घुसण्याकरिता गेट वे आॅफ इंडियाचा मार्ग निवडला होता. कारण ‘गेट वे’पासून हॉटेल ताज अत्यंत जवळ आहे. पण मी तो मार्ग रद्द करण्यास सांगितले. कारण या मार्गावरून येण्यापूर्वी नौदलाचा हवाई तळ ओलांडूनच ‘गेट वे’ला यावे लागले असते. नौदलाच्या हाती लागण्याची शक्यता असल्याने साजिद आणि इक्बालने माझा प्रस्ताव मंजूर केला.

कसाबला ओळखले
कसाबविषयी प्रश्न विचारला असता हेडलीने सांगितले की, तो पकडला गेल्यानंतर साजिद मीर आणि एलईटीच्या सगळ्या सदस्यांना अतिशय वाईट वाटले.
अ‍ॅड. निकम यांनी हेडलीला कसाबचा फोटो दाखवत हा कोण, असे विचारले. त्यावर हा कसाब असल्याचे सांगत हेडलीने पटकन उर्दूमध्ये कसाबच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हटले. न्यायाधीशांनी त्याबाबत विचारताच हेडलीने आपण कसाबच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हटल्याचे सांगितले.

Web Title: Army building was 'Target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.