सेनेची व्यूहरचना सपशेल फसली!
By admin | Published: October 24, 2014 04:27 AM2014-10-24T04:27:40+5:302014-10-24T04:27:40+5:30
विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली ना
संदीप प्रधान, मुंबई
विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली नाही, तर मुंबई व ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद गमावण्याची वेळ शिवसेनेवर चार महिन्यांनी येऊ शकते.
मुंबई शहरात भाजपाचा शिवसेनेपेक्षा एक जास्त आमदार विजयी झाला. ठाण्यात शहरातील जागा शिवसेनेने गमावली.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे २७ सदस्य असून त्यामध्ये शिवसेनेचे ९, भाजपाचे ४, मनसेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे ६, समाजवादी पार्टीचा १, अपक्ष १ तर गवळीच्या पक्षाचा १ असे सदस्य आहेत.
राज्यातील सरकारमध्ये सहभागी होताना शिवसेनेने आढेवेढे घेतले व काही कारणास्तव सहभाग झाला नाही, तर भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा व अपक्ष हे एकत्र येऊन शिवसेनेकडून अध्यक्षपद खेचून घेऊ शकतात. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७, भाजपाचा १, मनसेचा १, राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य आहेत. येथेही भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जाऊ शकते. असे झाल्यास महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची या दोन प्रमुख महापालिकांतील आर्थिक सत्ता संपुष्टात येऊ शकते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन १५०चा आग्रह सोडला असता तर विधानसभा निवडणुकीत ५३ ठिकाणी शिवसेना-भाजपा परस्परांच्या विरोधात लढले नसते. त्यापैकी ३२ ठिकाणी भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले तर २१ मतदारसंघांत शिवसेनेने भाजपाच्या उमेदवारांना धूळ चारली.