सेना नगरसेवकाची भररस्त्यात हत्या

By admin | Published: December 26, 2015 03:29 AM2015-12-26T03:29:16+5:302015-12-26T03:29:16+5:30

अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान शिवसेना नगरसेवक तसेच जळगावचे उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी मोरिवली उद्यानासमोर अनोळखी मारेकऱ्यांनी

Army corporator murdered | सेना नगरसेवकाची भररस्त्यात हत्या

सेना नगरसेवकाची भररस्त्यात हत्या

Next

अंबरनाथ : अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान शिवसेना नगरसेवक तसेच जळगावचे उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी मोरिवली उद्यानासमोर अनोळखी मारेकऱ्यांनी चॉपरने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या गुंजाळ यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले, पण चार तास मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या घटनेनंतर शहरात बंद पाळण्यात आला.
गुंजाळ हे सकाळी ९.१५च्या सुमारास मोरिवलीच्या निवासस्थानापासून दाढी करण्यासाठी बाहेर पडले. नेहमी सुरक्षारक्षकांसोबत निघणारे गुंजाळ घरातून एकटेच निघाल्याचा डाव मारेकऱ्यांनी साधला. गुंजाळ दाढी करून साधारण १५ मिनिटांनी घरी परतत असताना चारचाकी गाडीत दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी मोरिवली उद्यानासमोर त्यांच्या दुचाकीसमोर आपली गाडी आडवी करून त्यांना गाडीवरून पाडले आणि त्यांच्यावर धारदार चॉपरने वार केले. हातावर आणि डोक्यावर वर्मी गाव बसल्याने ते रस्त्यात कोसळले. मारेकऱ्यांनी लागलीच चॉपरने गुंजाळ यांचा गळा चिरून गाडीतून पळ काढला. (प्रतिनिधी)

चार तास मृत्यूशी झुंज
गुंजाळ यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच त्यांचे सहकारी धावतच घटनास्थळी आले. त्यांना टेम्पोत टाकून जवळच्या अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने लागलीच त्यांना रिक्षातून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले.
बेशुद्धावस्थेत असलेल्या गुंजाळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावल्याने त्यांना पुन्हा कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण, चार तास मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अंबरनाथ शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Army corporator murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.