‘महाराष्ट्र दिना’वरून सेना-भाजपात कुरघोडी
By admin | Published: April 28, 2016 02:47 AM2016-04-28T02:47:41+5:302016-04-28T02:47:41+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात ‘महाराष्ट्र दिना’चे कार्यक्रम करण्यावरून शिवसेना-भाजपात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.
मनोहर कुंभेजकर,
मुंबई-पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात ‘महाराष्ट्र दिना’चे कार्यक्रम करण्यावरून शिवसेना-भाजपात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. ‘महाराष्ट्र दिना’च्या पूर्वसंध्येला तिथे भाजपाचा कार्यक्रम होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १ मे रोजी शिवसेनेचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भाजपाचे व्यासपीठ आणि सजावट काढून शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी तातडीने पुरेशी जागा उपलब्ध होईल का, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालील नियोजित संग्रहालयाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेना-भाजपाने दिले आहेत. येत्या ३० एप्रिलला, ‘महाराष्ट्र दिना’च्या पूर्वसंध्येला विलेपार्ले येथील पुतळ्याच्या परिसरात भाजपाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या परिसरात सजावट व विद्युत रोषणाईचे काम जोरात सुरू आहे, तर शिवसेनेतर्फे १ मे रोजी सकाळी १० वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगणार आहे. या वेळी शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे.
तथापि, या पुतळ्यांवर जमा होणारी धूळ, पक्षांच्या पडणाऱ्या विष्ठेकडे कोणाचेही लक्ष नाही. अंधेरी (पूर्व) मरोळ येथील वेअरहाउस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळादेखील छत्रीविना धूळ खात आहे. त्यामुळे या दोन्ही पुतळ्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी दोन्ही पुतळ्यांवर छत्री असावी आणि रोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यात यावा, अशी मागणी ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केली आहे. सेना आणि भाजपाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळासमोरील टी-२ टर्मिनलच्या ५ एकर जागेत, लंडनच्या ट्राफलगर स्क्वेअरप्रमाणे उभारलेल्या नेल्सन यांच्या पुतळ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फुटी भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने केली आहे.
>एकाच सभास्थळाचा आग्रह
>च्शिवसेनेने महाराष्ट्रदिनाच्या सभेसाठी विलेपार्ले येथील मैदान निश्चित केले आहे. हा कार्यक्रम १ मे रोजी सकाळी होणार आहे
च्भाजपानेही महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रमही त्याच मैदानात होणार आहे.
च्भाजपाचा कार्यक्रम रात्री संपल्यानंतर सजावट आणि व्यासपीठ तेथून काढून शिवसेनेच्या कार्यक्रमाची तयारी करणे कठीण आहे.
च्त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील रस्सीखेच या कार्यक्रमांमधून स्पष्ट दिसून येणार आहे.