सेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
By admin | Published: September 16, 2015 01:12 AM2015-09-16T01:12:59+5:302015-09-16T01:12:59+5:30
महापालिका निवडणूक : विनायक राऊत मुलाखती अर्ध्यावरच सोडून गेले ?
कोल्हापूर : शिवसेनेतील शहरांतर्गत नेत्यांतील वाद मिटला असल्याच्या कितीही वल्गना वरिष्ठ नेते करत असले तरी इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. मुलाखती घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत मुलाखती अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याबाबतची चर्चा पक्षाच्या प्रचार कार्यालय परिसरात सुरु होती. राऊत गेल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी उर्वरित मुलाखती घेतल्या.
महापालिका निवडणुकीत मतदानाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरीही सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती सुरुकेल्या आहेत. शिवसेनेने सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या.
गेल्या सात-आठ वर्षांत शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांत असणाऱ्या वादाचा परिणाम या महापालिका निवडणुकीवर जाणवत आहे. गेल्या निवडणुकीवर या वादाचा परिणाम झाला. त्यावेळी अनेकांनी गटबाजीतून उमेदवारी जाणून-बुजून डावलल्याचा आरोप केला होता. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला होता.
यंदाच्या निवडणुकीतही या वादाचे पडसाद तसेच परिणाम होऊ नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी पातळीवरील नेत्यांनी हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळणार, असेही नेत्यांनी पुन्हा -पुन्हा ठासून सांगितले. दरम्यान, विनायक राऊत यांनी सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना थेट बजावून मुलाखती पूर्ण झाल्यानंतर अहवाल मुंबईला घेऊन येण्याचे बजावले आणि ते दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर काहीवेळ मुलाखती थांबल्याचे समजते, त्यानंतर पुन्हा मुलाखती सुरू करून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पहिल्या टप्प्यातील मुलाखती पूर्ण केल्या पण ही घटना मुलाखत सुरू असलेल्या बंद कक्षात घडल्याने त्याची उशिरा चर्चा प्रचार कार्यालय परिसरात सुरू होती. ते निघून गेल्याने मंगळवारच्या दुसऱ्या टप्प्यांतील मुलाखती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पूर्ण केल्या
सोमवारी पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच गटबाजीचे दर्शन खासदार राऊत यांनाच दिसून आले. या मुलाखतीवेळी कक्षात आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दुर्गेश लिंग्रस आदींचा समावेश होता.
शहरांतर्गत नेत्यांच्या दोन्ही गटांचा इच्छुक उमेदवारांत समावेश होता. मुलाखती घेण्याची प्रमुख भूमिका खासदार राऊत हे बजावत होते तर दोन्हीही गटांचे नेतेही आपल्या शिलेदारांना घेऊनही मुलाखत दालनात इच्छुकांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होते. मात्र, स्थानिक नेत्याने विरोधी गटाच्या इच्छुकाला प्रश्न विचारताना उंची आवाजात प्रश्न विचारत असल्याचे खासदार राऊत यांच्या निदर्शनास आले.
ही परिस्थिती स्थानिक दोन्हीही गटांकडून दिसून आल्याने खासदार राऊत हे वैतागले. त्यांनी ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर दोन्हीही नेत्यांना खडसावले. त्यानंतर त्यांनी काहीवेळ मुलाखती थांबवल्या.