सेनेच्या हाती फुटाणे!
By Admin | Published: December 3, 2014 04:06 AM2014-12-03T04:06:00+5:302014-12-03T10:37:21+5:30
उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यासारखी महत्वाची पदे आणि गृह, अर्थ, गृहनिर्माण यासारखी महत्वाची खाती
मुंबई : उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यासारखी महत्वाची पदे आणि गृह, अर्थ, गृहनिर्माण यासारखी महत्वाची खाती मागून स्वाभिमानाच्या बेटकुळ्या दाखविणा-या शिवसेनेच्या हातावर भाजपाने आरोग्य, पर्यावरण, उद्योग यासारख्या कमी महत्वाच्या खात्यांचे चणे-फुटाणेच ठेवले. पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्री पदं पदारात पाडून घेऊन शिवसेनेने निवडणुकीत जे कमावले, ते तहात गामवले, अशीच सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपासोबत असलेली युती तोडून स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या, तर १२३ जागा मिळवून भाजपाने सरकार स्थापन केले. बहुमतासाठी भाजपाला जागा कमी पडत असल्याने भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेने अटी-शर्र्थींची भलीमोठी यादीच पुढे केली. उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षपद या पदांवर दावा सांगत असतानाच गृह, अर्थ, महसूल, बांधकाम अशा खात्यांसाठी आग्रह धरला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर भाजपाने विश्वसादर्शक ठराव जिंकला. सत्तेसाठी अडून बसलेल्या शिवसेनेने मग विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. एकीकडे विरोधी पक्षाची भूमिका वठवतानाच दुसरीकडे सत्ता सहभागाकरिता ‘वर्षाह्णचे दार ठोठावणे सुरु ठेवले. सेनेच्या अनंत गिते यांनी अखेरपर्यंत मंत्रीपद सोडले नाही. त्यामुळे सत्ता सहभागाची आसुसलेल्या सेनेला वाटाघाटीच्या चक्रव्यूहात अडकवून तब्बल दीड महिन्यांनंतर कमी महत्वाच्या खाती हातावर टेकवली. (विशेष प्रतिनिधी)
> शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते आदींच्या उपस्थितीत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेला देऊ केलेल्या खात्यांबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.
मात्र आता मनाजोगी खाती मिळत नाहीत, म्हणून सत्तेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली तर जनतेमध्ये छी थू होईल, असे सर्वांचे मत पडले. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्र्यांशी बोलून गृहनिर्माण किंवा सार्वजनिक बांधकाम खाते मिळवून अब्रू राखावी, अशी भावना व्यक्त झाल्याचे समजते.