दादरमधील मैदानावरून सेना-मनसेत जंग
By admin | Published: February 17, 2017 10:50 AM2017-02-17T10:50:44+5:302017-02-17T10:59:46+5:30
दादारमधील सभेसाठी मैदानाच्या मुद्यावरू शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले असून त्यांच्यात नवी जंग सुरू झालेली दिसत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - महापालिका निवडणुकीची तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षांनी राजकीय सभांचा, प्रचाराचा धडाका लावला असून कुरघोडीच राजकारणही सुरू झालं आहे. प्रचारसभेला चांगल मैदान मिळावं यासाठी सर्वच नेते प्रयत्न करत असून त्यावरूनही वाद सुरू झाला. असाच नवा वाद निर्माण झाला आहे तो शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये. मैदानाच्या मुद्यावरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले असून त्यांच्यात नवी जंग सुरू झालेली दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेने दादरमधील दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. मात्र शिवसेना नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावत आम्ही हे मैदान आत्ता नव्हे तर खूप आधीच बूक केल्याचे म्हटले आहे. तसेच ' कधीही झोपेतून जागे होऊन मैदान मागणाऱ्यांना का मैदान देऊ' असा सवालही शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी विचारला आहे.
मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उद्या संध्याकाळी बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे, तर मग शिवसेनेला दुसऱ्या मैदानाची गरज कशासाठी? असा सवाल मनसेने विचारला आहे. मात्र उद्धव यांची सभा नसली तरी सेनेचे इतर नेते दत्ता राऊळ मैदानाव सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच बूक केले आहे, असा दावा शिवसेनेने केला.