सेना आमदार बाळा सावंत यांचे निधन
By Admin | Published: January 10, 2015 02:00 AM2015-01-10T02:00:23+5:302015-01-10T02:00:23+5:30
शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांचे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ‘मातोश्री’चे आमदार ही त्यांची ओळख होती.
मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांचे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ‘मातोश्री’चे आमदार ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सच्चा शिवसैनिक हरवल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
सावंत यांनी २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे (पूर्व) येथून विजय मिळवला होता. यावेळच्या निवडणुकीपूर्वी युती तुटल्यामुळे ‘मातोश्री’ हे शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेला हा मतदारसंघ सावंत राखणार का, याबाबत कुतूहल होते. मात्र सावंत यांनी विजय प्राप्त करीत या मतदारसंघात शिवसेनेची पताका कायम राखली. सावंत हे तीनवेळा मुंबई महापालिकेचे सदस्य होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सावंत यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. बाळा सावंत प्रचंड जनसंपर्कासाठी ओळखले जात. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही वर्षांत मतदारसंघातील त्यांचा थेट संपर्क कमी झाला होता.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी व शिवसैनिकांनी सावंत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सावंत यांच्या निधनाने लढाऊ कार्यकर्ता गमावला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामान्य लोकांशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली होती. अडीअडचणीला हाकेवर धावून येणारा कार्यकर्ता ही त्याची ओळख अखेरपर्यंत कायम होती, असेही फडणवीस म्हणाले.