सेना आमदारांनाही भाजपाप्रमाणेच निधी!

By admin | Published: April 1, 2017 03:23 AM2017-04-01T03:23:31+5:302017-04-01T03:23:31+5:30

शिवसेना भाजपासोबत सत्तेत असली तरी निधी वाटपाबाबत भाजपाच्या आमदारांना झुकते माप दिले जाते आणि

Army MLAs have funds like BJP! | सेना आमदारांनाही भाजपाप्रमाणेच निधी!

सेना आमदारांनाही भाजपाप्रमाणेच निधी!

Next

मुंबई : शिवसेना भाजपासोबत सत्तेत असली तरी निधी वाटपाबाबत भाजपाच्या आमदारांना झुकते माप दिले जाते आणि आमच्या आमदारांवर अन्याय होतो, अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटून केली. त्यावर, दोन्ही पक्षांच्या आमदारांना समान विकास निधी दिला जाईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. निधीवाटपाच्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी या मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटावे असा निर्णय मातोश्रीवरील बैठकीत झाला होता. त्यानुसार शिवसेनेचे मंत्री शुक्रवारी वर्षावर पोहोचले. विकास निधीमध्ये कोणताही दुजाभाव न करता सर्वच पक्षांच्या आमदारांना समान निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली. सेनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत भाजपाप्रमाणे सेनेच्या आमदारांनाही समान विकासनिधी दिला जाईल. याबाबतचा निर्णय याच अधिवेशनात घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या मंत्र्यांमध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री रवींद्र वायकर, अर्जून खोतकर, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, दीपक केसरकर यांचा समावेश होता.
भाजपाच्या आमदारांना जादा निधी तर शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. अपुऱ्या निधीमुळे कामे रखडतात. त्यामुळे विकास निधीच्या वाटपात भेदभाव करू नका. हा निधी भाजपा, शिवसेना तसेच विरोधी पक्षांसह इतर पक्षांच्या आमदारांनाही समान निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे निधी वाटपात अन्याय होणार नाही. समान निधीचे वाटप केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कदम म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

कर्जमाफीचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीचा आम्ही सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पुनरुच्चार केला. कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असा आमचा विश्वास असल्याचेही शिंदे म्हणाले.

Web Title: Army MLAs have funds like BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.