सेना आमदाराची पोलीस निरीक्षकास मारहाण
By admin | Published: December 18, 2014 05:24 AM2014-12-18T05:24:20+5:302014-12-18T05:24:20+5:30
शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्याने येथे एकच गोंधळ झाला.
नागपूर : शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्याने येथे एकच गोंधळ झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्यावर भादंविच्या कलम ३२३, ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला.
याआधीही मनसेत असताना आ. जाधव यांनी औरंगाबाद येथे पोलिसांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली होती.
झाल्या प्रकाराबद्दल पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे स्वत: उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली.
ठाकरे आज नागपुरात आले होते. हॉटेल प्राईडमध्ये शिवसेना मंत्री आणि आमदारांची बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या सूटमध्ये गेले. त्यानंतरही त्यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांचे येणे सुरूच होते. कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी रामदास कदम यांच्यावर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास एका मंत्र्यापाठोपाठ आ. जाधव हॉटेलमध्ये आले. कदम यांनी दार उघडले व मंत्र्यांना आत घेतले; मात्र जाधव यांना बाहेर थांबण्याचे सांगत दार लावून घेतले. त्यामुळे आ. जाधव चिडले. त्यांनी तेथे गोंधळ सुरू केला. पोलीस निरीक्षक पराग जाधव नाशिक येथील विशेष सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. ते अधिवेशनाच्या बंदोबस्ताला आले आहे. आज त्यांना ठाकरे यांच्या सुरक्षा बंदोबस्ताचे प्रमुख म्हणून वरिष्ठांनी जबाबदारी सोपवली होती. गोंधळ होत असल्याचे पाहून त्यांनी आ. जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आ. जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली.
ही माहिती उद्धव ठाकरे यांना कळली. त्यामुळे त्यांनी पराग जाधव यांना बोलवून घेतले. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून तुम्ही या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास मोकळे आहात, असे सांगितले. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पराग जाधव पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे त्यांनी
दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आ. जाधव यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणेदार पी.आर. शहा यांनी दिली. (प्रतिनिधी)