सेना सत्तेच्या बाकावर
By admin | Published: December 5, 2014 04:15 AM2014-12-05T04:15:14+5:302014-12-05T04:31:14+5:30
म्हणे, जनभावनेचा आदर राखून आम्ही एकत्र आलो..तब्बल ४६ दिवस चाललेल्या वाटाघाटीनंतर अखेर शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सूत जुळले. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या घटस्फोटानंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले.
मुंबई : तब्बल ४६ दिवस चाललेल्या वाटाघाटीनंतर अखेर शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सूत जुळले. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या घटस्फोटानंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे आता राज्यात एकट्या भाजपाचे नव्हे, तर ‘युती’चे सरकार असेल. शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्री अशी एकूण डझनभर मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यापैकी दहा मंत्री शुक्रवारी शपथ घेतील. तर त्याचवेळी भाजपाच्या ८ ते १० मंत्र्यांचाही शपथविधी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे सेना आता विरोधी बाकावरून सत्तेच्या बाकावर येईल. राज्यातील निवडणुकीचा कौल हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात होता. त्यामुळे आता पुन्हा आम्ही युती करून पाच वर्षे स्थिर सरकार देणार आहोत. तसेच पुढील जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका एकत्रित लढणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. तर मजबूत सरकार देण्याकरिता आणि जनभावनेचा आदर राखून आम्ही एकत्र येत असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. शुक्रवारी शिवसेनेच्या वाट्याच्या १२ मंत्र्यांपैकी १० मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, तर भाजपाचे ८ ते १० मंत्री शपथ घेतील, असे फडणवीस यांनी जाहीर केले. राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद असणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारचे कामकाज सुरळीत चालवण्याकरिता एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. भाजपाकडून बापट, महाजन व बावनकुळे भाजपाकडून गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, बबन लोणीकर, राजकुमार बडोले यांना कॅबिनेट मंत्री करण्यात येणार असून राम शिंदे, रणजित पाटील, विजय देशमुख, महाराज अंबरिश आत्राम आणि प्रवीण पोटे यांना राज्यमंत्री करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांचा आज राजीनामा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर निवड झालेले एकनाथ शिंदे हे शुक्रवारी आपल्या या पदाचा राजीनामा देतील व त्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतील. शिंदे हे औटघटकेचे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर काँग्रेस या पदावर दावा करु शकेल.
> सेनेकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे. शिंदेंकडे राज्य रस्ते विकास महामंडळ, रावतेंकडे परिवहन, देसार्इंकडे उद्योग तर कदमांकडे पर्यावरण ही खाती सोपवण्याचे संकेत आहेत. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे आरोग्य खाते दिले जाऊ शकते. राज्यमंत्री म्हणून रवींद्र वायकर, संजय राठोड, विजय शिवथरे, दादा भुसे व दीपक केसरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. राठोड यांच्याकडे ग्रामविकास, भुसेंकडे सहकार, केसरकर यांच्याकडे वित्त व महसूल, वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण तर, शिवथरे यांच्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण ही खाती असतील. शिवसेनेने आपल्या कोट्यातील आणखी दोन मंत्री भरल्यावर केसरकर आणि वायकर यांच्याकडील एक-एक खाते त्यांच्याकडे देण्यात येईल.
> काँग्रेसची टीका : सेनेचे नेते मान खाली घालून शपथ घेतील! स्वाभिमानाची भाषा करणारे शिवसेनेचे नेते आता ताठ मानेने नव्हे तर माना खाली घालून आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतील, अशा बोचºया शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना-भाजपाच्या एकत्र येण्यावर आज टीकास्त्र सोडले.