लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी गोव्यात छापे टाकून तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 07:31 PM2017-02-26T19:31:10+5:302017-02-26T19:31:10+5:30
लष्कराच्या भरतीसाठी सुरू असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकण्याचे छडयंत्र उघडकीस आल्यानंतर
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 26 - लष्कराच्या भरतीसाठी सुरू असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकण्याचे छडयंत्र उघडकीस आल्यानंतर गोव्यातही छापे टाकण्यात आले. हणजुणे येथे छापा टाकून तिघांना हणजुणे पोलिसांनी रंगेहाथ पकडून ठाणे क्राईम ब्रँचच्या स्वाधीन केले.
ही कारवाई शनिवारी रात्री १० च्या सुमारास झाल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. गोव्यातील परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी ४९ जणांना संपर्क करून त्यांच्याशी डील सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. हणजुणे येथील ज्या संध्या बारमध्ये ही कारवाई झाली त्या ठिकाणी ४९ उमेदवार आणि अन्य तिघे युवक होते. हे तिघे उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका विकण्याच्या तयारीत होते. तिघा सौदेबाजांसह ४९ उमेदवारांनाही ताब्यात घेण्यात आले. ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. तिघांनाही ठाणे क्राईम ब्रँचच्या स्वाधीन करण्यात आले.
सौदेबाजांनी आणलेल्या प्रश्नपत्रिका या खरोखरच लष्कर भरती परीक्षेच्याच आहेत की बोगस आहेत याची खात्री करून घेण्यापूर्वी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्रभर त्यांना ताब्यात घेऊन ठेवण्यात आले होते. रविवारी १० वाजता फोंडा येथील केंद्रात परीक्षा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी परीक्षेची प्रश्नपत्रिका तपासून पाहिले तेव्हा सौदेबाजांकडे असलेली प्रश्नपत्रिका समान असल्याचे आढळून आले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सौदेबाजांना अटक करण्यात आली असे गुप्ता यांनी सांगितले.
व्हॉटसेपव्हरून सौदा
एका उमेदवाराला एक पेपर २ लाख रुपये या दराने विकला जाणार होता. एकूण ४९ उमेदवारांशी सौदा ठरला होता. पैसे घेऊन त्याचवेळी सौदेबाज आपल्या व्हॉटसेपमध्ये असलेली प्रश्नपत्रिका उमेदवाराला पाठविणार होते. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा हा सौदा झाला होता, सुरू होता की सुरू झालाच नव्हता याची माहिती पोलिसांनी उघड केली नाही, परंतु तिघाही सौदेबाजांकडून पैसे जप्त करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. परंतु हा सौदा झालेला असेल तर तो प्रत्येकी २ लाख रुपये या प्रमाणे ४९ उमेदवारांकडून ९८ लाख रुपये एवढा होत आहे.