12 बंदुकींच्या हवेत तीन फैरीने अन अंतिम बिगुल वाजवून लष्कराची मानवंदना
By admin | Published: February 16, 2016 07:38 PM2016-02-16T19:38:39+5:302016-02-16T19:47:33+5:30
शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज मस्करवाडी येथे 12 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
>- शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा : शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज मस्करवाडी येथे 12 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री विजय शिवतारे, खा. विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर घार्गे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मस्करवाडी येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
आज पहाटे कुकुडवाडी येथून लष्काराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. 'अमर रहे अमर रहे सुनील सूर्यवंशी अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान तुझे सलाम' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा मस्करवाडी या गावी पोहचली. या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. या ठिकाणी पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली. येथे ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवाला पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी शिवतारे म्हणाले, सातारा ही वीरांची भूमी आहे शहीद कर्नल संतोष महाडीक, शहीद सुनील सूर्यवंशी असे वीर जवान जो पर्यंत या भूमीमध्ये जन्म घेत आहेत, तो पर्यंत आपल्या देशाकडे वाकडी नजर करुन पाहायची कोणाचीही हिंमत होणार नाही. दुर्गम, दुष्काळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन या भागातील वीररत्ने भारत मातेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतात याचा मला सार्थ अभिमान आहे.
गावात मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात फ्लेक्स लावले होते. फुलांनी रांगोळ्या सजविलेल्या होत्या. ही अंत्ययात्रा मस्करवाडी येथे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
लष्कराच्या 12 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. यानंतर शहीद सुनील सूर्यवंशी यांचे वडील बंधु तानाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.