सेना स्टाईलने काँग्रेस चालवू नका
By admin | Published: June 9, 2016 06:00 AM2016-06-09T06:00:25+5:302016-06-09T06:00:25+5:30
निरुपम शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले असले तरी त्यांनी अद्याप काँग्रेस संस्कृती आत्मसात केलेली नाही.
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले असले तरी त्यांनी अद्याप काँग्रेस संस्कृती आत्मसात केलेली नाही. शिवसेना स्टाईलने पक्ष चालविण्याचा हट्ट त्यांनी सोडून द्यावा आणि काँग्रेसची सर्वसमावेशक शैली स्वीकारावी, असाच सूर आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयाबाहेर जमलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आळवला. गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय बदलावा आणि पक्षकार्यात सक्रीय व्हावे, यामागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन केले.
काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी राजकारण निवृत्ती आणि काँग्रेसमधील पदांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुंबई काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कामत समर्थकांनी यानिमित्तने जोरदार शक्तीप्रदर्शन करत निरुपम यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्याची संधी साधली. बुधवारी काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनास कामत गटातील नेत्यांसोबतच संजय निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे दुखावलेल्या नेत्यांनी हजेरी लावली.
आमदार नसीम खान, जनार्दन चांदूरकर यांच्यासह माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मधू चव्हाण, कृष्णा हेगडे, अशोक जाधव, बलदेव खोसा आदी नेत्यांनी यावेळी आंदोलकांना संबोधित केले. मुंबई महापालिकेतील २७ नगरसेवकांसह मुंबई काँग्रेसमधील विविध आघाड्या आणि सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई काँग्रेसच्या वाटचालीत गरुदास कामत यांनी महत्वाची भूमिका बजावली
आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवृत्ती पक्षाला परवडणारी नाही. कामत यांनी निवृत्तीचा विचार सोडून द्यावा आणि पक्षकार्यात सहभागी व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
२५ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत़ त्याच दरम्यान गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधील गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे़ पालिकेतील काँग्रेसच्या संख्याबळाच्या निम्मे म्हणजे २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत़ देवेंद्र आंबेरकर, ज्योत्स्ना दिघे, मोहसीन हैदर, भौमसिंग राठोड, शीतल म्हात्रे, सुषमा राय, चंगेझ मुल्तानी हे काही नगरसेवक कामत समर्थक म्हणून ओळखले जातात़
विरोधी पक्षनेतेपद संकटात महापालिकेत काँग्रेसचे ५१ नगरसेवक असून गुरुदास कामत आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम असे दोन गट आहेत़
या दोन्ही गटांमध्ये आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरू असते़ कामत गटाचे देवेंद्र आंबेरकर यांचा पत्ता साफ करुन निरुपम गटाचे प्रवीण छेडा यांची काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली़ मात्र कामत गटही आता आक्रमक झाला आहे़
निरुपम गटाला शह देण्यासाठी राजीनाम्याचे हत्यार त्यांनी उपसले आहे़ २५ नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस विरोधी बाकावरील सर्वांत मोठा पक्ष राहणार नाही़ त्यामुळे विरोधी पक्षनेते पदही संकटात
येईल. (प्रतिनिधी)
>निदर्शने करू नका - गुरुदास कामत
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या आपल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चे काढू नयेत आणि आंदोलने करू नयेत, असे आवाहन गुरुदास कामत यांनी बुधवारी आपल्या समर्थकांना केले. शिवाय कोणीही आपल्या पदांचा राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. कामत यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सलग दुसऱ्या दिवशी कामत समर्थकांनी निदर्शनांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई महापालिकेतील २७ नगरसेवकांसह मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारीही राजीनामे सादर करणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर कामत
यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून समर्थकांना आंदोलन न करण्याचे
आवाहन केले. कोणत्याही नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्यांनेही राजीनामा देण्याची गरज नसल्याचे कामत यांनी पत्रकात स्पष्ट केले.
कामत यांच्या मनधरणीचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुदास कामत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, अशीच सर्व काँग्रेसजनांची इच्छा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. कामत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संपर्क साधण्याचा प्रयत्न
कामतांच्या घरवापसीसाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत असले तरी त्यात फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कामत कोणत्याच नेत्याचा फोन उचलत नाहीत. तसेच कोणाच्याही मेसेजला उत्तर देत नसल्याने त्यांच्याशी संपर्क करणेच कठीण बनले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अनेक नेत्यांचे कामत यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत.
‘सामूहिक निर्णयाची परंपराच खंडित’
यावेळी मुंबई काँग्रेसमधील सध्याच्या कारभारावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे. सर्वच महत्वाची पदे बाहेरुन आलेल्या लोकांना वाटली जात आहेत. सामूहिक निर्णयाची पक्षाची परंपराच खंडीत झाली आहे. अन्य पक्षांतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनी आपल्याच पद्धतीने पक्ष चालविण्याचा हट्ट धरल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.