सेना केंद्रातून बाहेर पडणार!
By Admin | Published: September 30, 2014 02:53 AM2014-09-30T02:53:14+5:302014-09-30T02:53:14+5:30
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
>राज यांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंचा निर्णय : अवजड उद्योगमंत्री अनंत गीते देणार राजीनामा
मुंबई : भाजपाबरोबरची युती तोडल्यानंतरही शिवसेना केंद्र सरकारमध्ये सहभागी कशी, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली तरी गीते यांना सरकारमधून बाहेर पडण्याचा आदेश ना भाजपाने दिला होता ना शिवसेना तसा निर्णय घेत होती. मात्र केंद्रातील व महापालिकांमधील भाजपासोबतची
युती सुरू ठेवण्याचा ढोंगीपणा कशाला,
असा सवाल राज यांनी केल्यानंतर
शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.
याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ:यावरून परतल्यावर गीते त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील. महापालिकांमधील सत्ता सोडण्याबाबत विचारले असता, तुम्हाला घाई असली तरी सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय करायचा आहे. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुढी यांनी असा खुलासा केला की, भाजपाने गीते यांचा राजीनामा मागितलेला नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी तसा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. (विशेष प्रतिनिधी)
बाद होता-होता आबा वाचले!
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांच्यावर बेळगावात दाखल झालेल्या गुन्ह्याची नोंद नसल्याने तो बाद करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे उमेदवार अजित घोरपडे यांनी निवडणूक निर्णय अधिका:यांकडे केली होती़ तर अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रत या गुन्ह्याची माहिती दिलेली असून, तेथे गुन्हा नोंद नसून केवळ एफआरआय नोंद आहे, असा प्रतिवाद आर.आर. पाटील यांच्या वतीने करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यांचा अभ्यास करून पाटील यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
अनंत तरेंचा अर्ज बाद
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना आव्हान देणा:या अनंत तरे यांनी अपूर्ण अर्ज भरल्याने तो छाननीत बाद ठरविण्यात आला़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिल्याने नाराजी दूर झाल्याचे तरेंनी सांगितले
मुंबईतील 56 उमेदवारांचे अर्ज बाद
मुंबई शहर व उपनगरातील 36 मतदारसंघांतील 56 उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरविले. यात चांदिवलीतील भाजपा उमेदवार सीताराम तिवारी व वर्सोवातील सेना उमेदवार राजुल पटेल यांचा समावेश आहे. चांदिवलीत भाजपा आता रिपाइंच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.