...तर सेना स्टाईलने समजावणार!
By admin | Published: November 30, 2015 03:07 AM2015-11-30T03:07:18+5:302015-11-30T03:07:18+5:30
राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे.
नांदेड/परभणी/जालना : राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे. या अधिकाऱ्यांचे काय करायचे ते मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ठरविले पाहिजे. संबंधितांना सरकारी भाषा समजत नसेल, तर शिवसेनेच्या भाषेत त्यांना समजवायचे का, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.
जालना, नांदेड आणि परभणी येथे शिवसेनेच्या वतीने उद्धव यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. जालना व नांदेडला प्रत्येकी १ हजार व परभणीत ९ शेतकऱ्यांना उद्धव यांच्या हस्ते १० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ३ शेळ्या, संगोपनासाठी ५ हजार रुपये आणि विमापत्राचे वाटप करण्यात आले़
उद्धव म्हणाले, निवडणुका आल्या की नेत्यांचा सुकाळ असतो. जेवढा मोठा नेता तेवढी मोठी थाप असते. मात्र, सध्या कोणत्याही निवडणुका नसताना शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. पक्षाचे सर्व मंत्री व आमदार गेले दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दुष्काळी स्थितीचा अभ्यास केला. आत्महत्या न करण्याचे आणि इतरांनाही सावरण्याचे वचन उद्धव यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतले.
आम्ही सरकारमध्ये असलो तरी शेतकरीविरोधी धोरणांचा नेहमीच विरोध करू़ सरकारमध्ये असलो काय अन् नसलो काय? जनतेच्या हितासाठी टीकाच काय तर सरकारचा पंचनामाही करू, अशा शब्दांत उद्धव यांनी सुनावले़ उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, संजय राठोड, रवींद्र वायकर, दादाभाऊ भुसे आदी त्यांच्यासोबत होते.
शासकीय योजनांची घोषणा होत असताना त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आता शिवसैनिकांची राहील, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले़ लोकांनी जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधावा. तक्रारींची १० दिवसांत दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
एसटीतर्फे ९ कोटी
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.महामंडळाचे कर्मचारी व संघटनांच्या वतीने ९ कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले.
छायाचित्रांच्या बोलीतून निधी
दुष्काळग्रस्तांना आतापर्यंत ७ ते ८ कोटी रूपयांची मदत केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या बोलीतून ही रक्कम उभी राहिली असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.