सेना गोव्यात ५ जागा लढवणार
By admin | Published: December 23, 2016 04:34 AM2016-12-23T04:34:47+5:302016-12-23T04:34:47+5:30
शिवसेनेने साळगाव मतदारसंघात राजेश दाभोळकर या युवानेत्याला उमेदवारी जाहीर केली आहे. थिवी, वास्को, पेडणे तसेच
पणजी : शिवसेनेने साळगाव मतदारसंघात राजेश दाभोळकर या युवानेत्याला उमेदवारी जाहीर केली आहे. थिवी, वास्को, पेडणे तसेच अन्य एक मिळून आणखी चार मतदारसंघांमध्ये येत्या दोन दिवसांत सेनेचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती शिवसेनेचे गोवा प्रभारी आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दिली. दाभोळकर यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात महायुतीची गरज व्यक्त करून मगोने महायुतीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन केले. गोव्याच्या राजकीय परिवर्तनात गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, मगो महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सुभाष वेलिंगकर तसेच गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांच्याशी बुधवारी प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. महायुती झाली, तर जागावाटप तसेच अन्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार वेलिंगकर यांनाच असतील. शिवसेनेने पाच जागा पूर्ण ताकदीने लढण्याचे निश्चित केले आहे; परंतु महायुतीच्या गरजेनुसार त्यात लवचीकपणा येऊ शकतो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)