एकात्मतेत लष्कराची भूमिका महत्त्वाची

By admin | Published: May 30, 2017 01:52 AM2017-05-30T01:52:01+5:302017-05-30T01:52:01+5:30

देशाच्या एकात्मतेत आणि बांधणीत लष्कराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादापासून धोका आहे. मातृभूमीच्या संरक्षणाकरिता

Army's role in unity is important | एकात्मतेत लष्कराची भूमिका महत्त्वाची

एकात्मतेत लष्कराची भूमिका महत्त्वाची

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘देशाच्या एकात्मतेत आणि बांधणीत लष्कराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादापासून धोका आहे. मातृभूमीच्या संरक्षणाकरिता तुम्ही तयार झाला असला तरी या परिस्थितीत तुम्ही शिकलेल्या कौशल्यांचा कस लागणार आहे, यासाठी नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३२ व्या तुकडीचा सोमवारी पदवीदान सोहळा हबीबुल्लाह सभागृहात दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी एनडीएचे कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग क्लेर, डेप्युटी कमांडंट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात बीए, बीएस्सी, बीएस्सी कॉम्प्युटर शाखेच्या ३०८ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यातील ६ परदेशी विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बटालियन कॅडेट कॅप्टन आकाश के. आर. याला रौप्यपदक आणि चीफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉॅफीने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर तिन्ही शाखांतून प्रथम राहिल्याबद्दल चीफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीनेही त्याला सन्मानित करण्यात आले. कॉम्प्युटर शाखेत प्रथम आल्याबद्दल कॅडेट क्वॉटर मास्टर आदित्य निखारा याला रौप्यपदक, तसेच अ‍ॅडमिरल ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. कला शाखेत प्रथम आल्याबद्दल स्क्वाड्रन कॅप्टन देवेंद्र कुमार कमांडंट रौप्यपदक आणि चीफ आॅफ एअर स्टाफ ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
राव म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने आतापर्यंत देशाला ३५ हजारांहून अधिक लष्करी अधिकारी देशसेवेसाठी दिले आहेत. तीन वर्षांच्या काळात शिस्त, अनुशासन आणि नेतृत्व करण्यास तुम्ही सक्षम झाला आहात. कोशल्यांच्या बळावर तुम्ही अनेक उंची गाठाल. या मार्गात तुमच्यापुढे अनेक आव्हाने असतील. ही आव्हाने सक्षमपणे पेलण्यासाठी नवीन बदल, नवे तंत्र स्वीकारण्याची गरज आहे. हे करताना तुमच्या कौशल्याचा कस लागणार आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशातील शांततेच्या काळात होते. भारतासह संपूर्ण जगासमोर दहशतवादाचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही सक्षम आहात.’’
एनडीएचे कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग क्लेर म्हणाले, ‘‘तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी तुम्ही सज्ज झाला आहात. या काळात तुम्ही केलेले ज्ञानार्जन आणि मूल्ये भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी मोलाची ठरतील. या मूल्यांच्या आणि प्रक्षिणाच्या आधारावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने देशाला प्रगल्भ आणि सक्षम लष्करी अधिकारी देशाला दिले आहेत.’’


आजोबांचे स्वप्न केले पूर्ण : देवेंद्र कुमार

1वयाच्या १२ व्या वर्षी आर्मी स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले तेव्हापासून लष्करात जाण्याचे स्वप्न होते. आजोबा लष्करातून हॉनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. वडील सध्या राजस्थानमध्ये सुभेदारपदावर लष्करातच आहे. मी लष्करात मोठा अधिकारी व्हावे, अशी आजोबांची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली आहे, असे मत बीए शाखेतून प्रथम आलेल्या देवेंद्र कुमार याने व्यक्त केली. देवेंद्र मूळचा हरियानातील रेवडी जिल्ह्यातील. त्यांच्या घरातील लष्करातील ही तिसरी पिढी आहे. तीन वर्षांत एनडीएमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामुळे कुठल्याही परिस्थितीत काम करण्यासाठी सक्षम झालो आहोत. पूर्वीपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचे देवेंद्र म्हणाला. भविष्यात पायदलात जायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला.
2काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी लेफ्टनंट उमर फयाज यांची क्रूर हत्या केली.
उमर फैयाज आमच्याच बटालियनमधील होते. प्रशिक्षण काळात त्यांना जवळून पाहिले होते. फैयाज अतिशय हसरे आणि उत्साही अधिकारी होते. त्यांची अशी हत्या होणे आमच्यासाठी धक्कादायक बाब आहे. त्यांचे बलिदान आम्ही कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे देवेेंद्र म्हणाला.

देशाचे सार्वभौमत्व टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच
 कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग यांनी एनडीएच्या पदवीदान समारंभात नवीन  पायंडा पाडत कार्यक्रमानंतर विद्यार्थी  आणि पालकांशी थेट संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की प्रत्येक सैनिकाचे देशांच्या सीमांचे संरक्षण करण्याचे स्वप्न असते. या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी हे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी आलेला असतो. यात पालकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांना प्रेरणा दिल्यास मुले आपले ध्येय गाठू शकतात. पालकांच्या पे्ररणेमुळेच एनडीएतील खडतर प्रशिक्षण विद्यार्थी पूर्ण करू शकले. देशाचे सार्वभौमत्व जपण्याचे काम फक्त लष्कराचेच नाही. देशातील प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे, यासाठी पालकांनीच मुलांना प्रेरित करायला हवे.

एनडीएने शिकवले साहस, धैर्य आणि नीतिमूल्य : आदित्य निखारा
 आपला मुलगा लष्करात अधिकारी व्हावा, अशी लहानपणापासून आई-वडिलांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली, अशी प्रतिक्रिया रौप्यपदकप्राप्त आदित्य निखारा याने दिली. आदित्य मूळचा मध्य प्रदेशातील नेवारी येथील आहे. तो म्हणाला, माझ्या वडीलांना लहानपणापासून लष्करी अधिकारी व्हायचे होते. मात्र, आजोबांनी त्यांचा भरलेला अर्ज माघारी घ्यायला लावला. यामुळे वडिलांची लष्करी अधिकारी होण्याची इच्छा अपुरी राहिली. मात्र, एनडीएतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.प्रशिक्षण काळात साहस, धैर्य आणि नीतिमूल्ये शिकलो. भविष्यात लष्कराच्या तोफखाना शाखेत जाण्याचा मानस आदित्यने व्यक्त केला.

फायटर पायलट व्हायचे आहे : आकाश के. आर
एनडीऐत तीन वर्षांत केलेल्या कामगिरीनंतर भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे आहे, अशी मनीषा आकाश के. आर. या विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. आकाश त्रिवेंद्रम येथील असून तो घरातील पहिला लष्करी अधिकारी आहे.आकाश म्हणाला, एनडीएतील तीन वर्षे आव्हाहनात्मक होते.
तीन वर्षांच्या काळात बऱ्याच गोष्टी शिकलो. प्रशिक्षण काळात खूप मेहनत घेतली. प्राध्यापकांनी तसेच प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि जिद्दीमुळे हे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो. आकाशचे वडील त्रीवेंद्रम येथील लॉ कॉलेजचे प्राध्यापक आहे. आई वेटरनरी डॉक्टर आहे. आई वडीलांच्या मार्गदर्शनामुळे तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकतो असे आकाश शेवटी म्हणाला.

Web Title: Army's role in unity is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.