अर्णब गोस्वामींना 'हक्कभंग' भोवणार?, निखील वागळेंना झाली होती शिक्षा, एक पत्रकार गेले होते तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:34 PM2020-09-08T15:34:00+5:302020-09-08T15:41:04+5:30

अर्णब गोस्वामींना कोणती शिक्षा होणार, याचा निर्णय विधानसभेची हक्कभंग समिती घेणार

Arnab Goswami face privilege motions in state assembly know what will happen next | अर्णब गोस्वामींना 'हक्कभंग' भोवणार?, निखील वागळेंना झाली होती शिक्षा, एक पत्रकार गेले होते तुरुंगात

अर्णब गोस्वामींना 'हक्कभंग' भोवणार?, निखील वागळेंना झाली होती शिक्षा, एक पत्रकार गेले होते तुरुंगात

Next

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर गोस्वामींनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत यांच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली असून त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरी भाषेत केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.  

हक्कभंग म्हणजे काय?
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधांचा अपमान झाल्यावर हक्कभंग आणला जातो. लोकप्रतिनिधांचा मान राखण्याची जबाबदारी समाजाची असते. त्यामुळेच त्यांना माननीय मुख्यमंत्री, आमदार असं म्हटलं जातं. याचा भंग झाल्यास, बेछूट आरोप केल्यास हक्कभंग प्रस्ताव आणला जातो.

हक्कभंग प्रस्ताव आणल्यावर पुढे काय?
अर्णब गोस्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी उल्लेख करून अरेरावीची भाषा वापरली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. आता हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाईल. या समितीत सर्व पक्षातील नेत्यांचा समावेश असतो. त्यांची निवड विधानसभेचे अध्यक्ष करतात. विधानसभेतील पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून समिती सदस्यांची निवड होते.

हक्कभंग म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या आमदारांचे विशेषाधिकार

समितीमध्ये किती जणांचा समावेश?
हक्कभंग समितीमध्ये किती सदस्य असावेत, हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष ठरवतात. त्यासाठी सदनातील पक्षांचं पक्षीय बलाबल लक्षात घेतलं जातं. सध्याच्या परिस्थितीत भाजप सदनातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक सदस्य समितीत असतील. त्या तुलनेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सदस्यांची कमी असेल. पण त्यांची एकत्रित संख्या भाजपपेक्षा जास्त असू शकेल.

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने विधानसभेत मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव​​​​​​​

समितीकडून शिक्षा निश्चिती; अहवाल विधानसभेत
हक्कभंग समितीकडून अर्णब गोस्वामींना नोटीस बजावण्यात येईल. त्यांना काही दिवसांची मुदत देण्यात येईल. हक्कभंग समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्याची संधी त्यांनी दिली जाईल. त्यांनी माफी मागितल्यास त्यांना समज दिली जाईल. ते आपल्या आरोपांवर, विधानांवर ठाम असल्यास त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. हक्कभंग समिती याबद्दल अहवाल तयार करेल. हक्कभंग समितीत सर्वपक्षीय नेते असले, तरी तिचा अहवाल एकमतानं येतो. 

सदनाला शिक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार
हक्कभंग समिती गोस्वामींसाठी निश्चित करेल. त्यांना तुरुंगात पाठवायचं की सदनासमोर कामकाज सुरू असेपर्यंत हात जोडून दिवसभर उभं करायचं, याचा निर्णय हक्कभंग समिती घेईल. त्यानंतर समितीचा अहवाल सदनासमोर ठेवला जाईल. त्यावर चर्चा होईल. समितीनं सुनावलेली शिक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार सदनाला असतो.

रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न​​​​​​​

गोस्वामींसमोर कोणते पर्याय?
चूक मान्य केल्यास गोस्वामींना सभागृहाकडून समज दिली जाईल. अन्यथा त्यांना तुरुंगवास किंवा दिवसभर सदनात उभं राहण्याच्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्यासमोर न्यायालयात जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. लेखिका शोभा डे यांनी याच पर्यायाचा वापर केला होता. मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवण्यात यावेत, या सरकारच्या आदेशावर त्यांनी ट्विट केलं होतं. त्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. शोभा डे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं शोभा डे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीलाच स्थगिती दिली. एप्रिल २०१५ मध्ये ही घटना घडली.

याआधी कोणत्या पत्रकारांवर कारवाई?
ब्लिट्झचे पत्रकार रुसी करंजिया यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात आला होता. त्यांनी शासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांची रवानगी नागपूरच्या तुरुंगात करण्यात आली होती.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंविरोधात हक्कभंग आणण्यात आला होता. त्यांनी सरकारवर आरोप केले होते. त्यांना दिवसभर सभागृहात उभं करण्यात आलं होतं. 
नवशक्तीचे प्रकाश गुप्ते यांनाही हक्कभंगाला सामोरे जावं लागलं होतं. विधिमंडळातील प्रश्नांसाठी आर्थिक व्यवहार होतात, अशा स्वरूपाचा लेख त्यांनी लिहिला होता. 
काही पत्रकार हक्कभंग समितीसमोर त्यांची चूक मान्य करतात. मग त्यांना समज देऊन सोडलं जातं. पत्रकार प्रकाश पोहरे यांच्याबाबतीत असंच घडलं होतं.

Web Title: Arnab Goswami face privilege motions in state assembly know what will happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.