अर्नाळा किल्ला ग्रा.पं.च्या सरपंचाचे पद गेले
By admin | Published: July 13, 2017 03:35 AM2017-07-13T03:35:52+5:302017-07-13T03:35:52+5:30
कोकण आयुक्तांनी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांची हकालपट्टी करून त्यांचे ग्रा.पं. सदस्यत्वही रद्द केले आहे
शशी करपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : निर्मल भारत अभियानात शौचालयाच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून कोकण आयुक्तांनी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांची हकालपट्टी करून त्यांचे ग्रा.पं. सदस्यत्वही रद्द केले आहे. तर सदस्य असताना लाभ मिळवल्याचा ठपका ठेवून कांता अमृत म्हात्रे यांचे सदस्यत्व ही रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भाजपाने अर्नाळा ग्रामपंचायतीत बहुजन विकास आघाडीत फूट पाडून सरपंच पद पटकावले होते. आता पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी गैरव्यवहार उघडकीस आणून भाजपालाच हादरा दिला आहे.
अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत निर्मल भारत अभियानात शौचालयाच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याची तक्रार पंचायत त्यांनी केली होती. त्यानंतर वसई पंचायत समितीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर जानेवारी महिन्यात ग्रामसेविका मधुरा निकम यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी निलंबित केले होते. मात्र, सरपंच आणि उपसरपंचांवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे सभापती मेहेर यांनी थेट कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी चौकशी अहवाल तयार करून सरपंच आणि उपसरपंचांवर ठपका ठेऊन त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण आयुक्तांनी याप्रकरणी सुनावली घेतल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आपला निर्णय दिला. सरपंच भारती भास्कर वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि ग्रामसेविका मधुरा निकम यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सरपंच वैती आणि उपसरपंच मेहेर यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
या ग्रामपंचायतीने निर्मल भारत अभियानांतर्गत दहा लाभार्थ्यांचे ४ हजार ६०० रुपये प्रमाणे एकूण ४६ हजार रुपये खर्च केलेले आहेत. पण, त्याचा निधी लाभार्थ्यांना वाटप केल्याची कॅशबुकात नोंद नाही आणि प्रमाणकही उपलब्ध नाही. १० पैकी ३ लाभार्थ्यांनी शौचालये बांधलेली नाहीत. तर लाभार्थ्यांची रक्कम सरपंच वैती आणि ग्रामसेविका निकम यांनी खात्यातून काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना रक्कम दिलेली नाही. त्यामुळे यात अपहार झाल्याचा निष्कर्ष चौधरी यांनी काढला होता.
>दोन दिवसांत दोन ग्रामपंचायतींवर कारवाई
सोमवारी कोकण आयुक्तांनी भाजपाकडे असलेली मालजीपाडा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी गैरव्यवहार केल्याने बरखास्त करण्याची मोठी कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बाद झाल्याने भाजपाला दुसरा हादरा बसला येत्या डिसेंबर महिन्यात अर्नाळा किल्ला, मालजीपाडा आणि अर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता गावामध्ये राजकारण तापले आहे. भाजपाने पंधरा दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे सदस्य फोडून या ग्रापंचे सरपंचपद पटकावले. बविआच्या सभापती चेतना मेहेर यांनी भाजपाला हादरा दिला.