सुगंधी कंदिलपुष्पाची यावल अभयारण्यात नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 08:50 AM2022-10-27T08:50:07+5:302022-10-27T08:50:25+5:30
वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद घेतली आहे.
जळगाव : जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या यावल अभयारण्यात अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त वनस्पतींची नोंद आतापर्यंत झाली असून, आता पुन्हा नव्याने 'सेरोपेजिया ओडोरेंटा' म्हणजेच 'सुगंधी कंदिलपुष्पा'ची नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद घेतली आहे.
पश्चिम भारतात प्रदेशनिष्ठ असलेल्या आणि गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अगदी तुरळकपणे ही वनस्पती आढळून येते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आय.यू.सी.एन.) च्या रेड लिस्टमध्ये अतिसंकटग्रस्त (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून या वनस्पतीचा समावेश आहे. वनस्पती अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांचा या वनस्पती संबंधीचा शोधनिबंध 'बायोनेचर' या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
ही नोंद म्हणजे या वनस्पतीचे राज्यातील आढळस्थान ठरले आहे. या संशोधनासाठी त्यांना वनसंरक्षक डिगंबर पगार, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन तसेच मयूरेश कुलकर्णी, आकाश राऊत, रविंद्र फालक, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, वनपाल सुरेश देसले, वनपाल समाधान धनवट, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.
काय आहे वैशिष्ट्य...
वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, सुगंधी कंदिलपुष्प किंवा खरचुडी ही रुई कुळातील सेरोपेजिया या जातीतील वनस्पती आहे. ही २ मी लांबी पर्यंत वाढणारी वेलसदृश वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गुच्छात येतात. एका वेलीला सुमारे २०० फुले येतात. फूले पिवळी, सुगंधी वैशिष्ट्यपुर्ण रचनेची असतात. पाकळ्या खालून नळीच्या आकारात एकत्र येवुन वरील बाजुस पाच भागात विभागल्या जातात आणि कंदिलाप्रमाणे नक्षीदार कळस तयार होतो. म्हणुन या वनस्पतींचे कंदिलपुष्प हे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी केवळ यावल अभयारण्यातच आढळतात. यावरुन अभयारण्याचे जैवविविधता लक्षात येते. असे असूनही अभयारण्य उपेक्षित राहीले आहे.
- अश्विनी खोपडे, सहाय्यक वनसंरक्षक, यावल अभयारण्य