साहित्याला दिशा देणे हाच संमेलनाध्यपदाचा निकष हवा- अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:52 AM2018-10-29T01:52:44+5:302018-10-29T01:57:52+5:30

साहित्य वर्तुळातील अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहीन. या काळात साहित्य विश्वासाठी अधिकाधिक चांगले काम होईल यासाठी कायमच बांधील असेन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Arora Dhhere | साहित्याला दिशा देणे हाच संमेलनाध्यपदाचा निकष हवा- अरुणा ढेरे

साहित्याला दिशा देणे हाच संमेलनाध्यपदाचा निकष हवा- अरुणा ढेरे

googlenewsNext

मुंबई : मराठी साहित्यविश्वाची समृद्धी वाढविणारी आणि साहित्यविश्वाला सर्वार्थाने दिशा देणारी व्यक्ती हाच संमेलनाध्यक्षपदाचा निकष असावा, असे मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी रविवारी मांडले. संमेलनाध्यक्षपदी निवडी झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

संमेलनाध्यक्षाचे पद निवडणुकीशिवाय सन्मानाने दिले जावे, या महामंडळाच्या निर्णयाचा आनंद होताच. मात्र मराठी साहित्य विश्वाची समृद्ध परंपरा पुढे नेणारी एक प्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे सोपविली आहे, याचा आनंद झाला आहे. ती जबाबदारी पुढे नेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. साहित्य वर्तुळातील अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहीन. या काळात साहित्य विश्वासाठी अधिकाधिक चांगले काम होईल यासाठी कायमच बांधील असेन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

१८ वर्षांनी संमेलनाध्यक्षपदी स्त्री प्रतिनिधीची नेमणूक झाली आहे, याविषयी ढेरे म्हणाल्या, स्त्री किंवा पुरुष यापेक्षा साहित्य विश्वाला केंद्रस्थानी मानून त्यासाठी कार्य करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदी असावी, अशी कायम अपेक्षा होती. साहित्य क्षेत्रात स्त्री साहित्यिका, त्यांचे साहित्य कमी नाही. सध्या तरुणपिढीतील अनेक साहित्यिका उत्तम लिहित आहेत, त्यांचे लिखाण आश्वासक आहे. त्यांची प्रतिनिधी म्हणून हा मान मिळाल्याचे मी मानते.

विपुल ग्रंथसंपदा
ढेरे यांचे एम.ए. तसेच पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
डॉ. ढेरे या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून इ.स.१९८३ ते ८८ या काळात काम केले आहे. ‘कृष्णकिनारा’ हा त्यांचा कथा संग्रह विशेष गाजला आहे.

प्रकाशित साहित्य : वैचारिक पुस्तके, अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक उमदा माणूस, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, कवितेच्या वाटेवर, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, महाद्वार, लोक आणि अभिजात, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विवेक आणि विद्रोह, डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार.
कविता संग्रह : निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र, बंद अधरो से (हिंदी)
कथासंग्रह : अज्ञात झऱ्यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा, वेगळी माती, वेगळा वास.

पुरस्कार/सन्मान
- अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान.
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार
- पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा पुरस्कार (६ मे २०१६)
- मसापचा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला
- मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार (१८-९-२०१७)
- ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. (सन २०१७पासून)

Web Title: Arora Dhhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.